''तुमचे पायजमे बियजमे. लाज वाटत असेल !''
मुकुंदराव बाहेर छत्री घेऊन उभे राहिले. आनंदमूर्तींनी दार लावून घेतले. ट्रंकेतून सुंदर कपडे काढून परिधान केले.
''झाले, या आत.'' आनंदमूर्ती हळूच म्हणाले.
मुकुंदराव आत आले तो तिथे कोणी दिसेना. तेथे दाराआड कोणी तर लपले होते. कोण होते ते? मुकुंदराव तटस्थ झाले. ध्यानस्थ झाले. अनिमिष नेत्रांनी ते बघू लागले. शेवटी त्यांनी डोळे मिटले. मान खाली घातली. कोण होते तेथे? एक दिव्य देवता उभी होती. तलम खादीचे हिरव्या रंगाचे पात नेसून ती तेथे उभी होती. केस पाठीवर मोकळे सोडलेले होते. तोंडावर अपार प्रसन्नता होती व प्रेमाची कोवळीक होती.
''आनंदमूर्ती, मी जातो. तू पुन्हा पहिली आनंदमूर्तीच हो. तरच मला आनंद मिळेल.''
असे म्हणून मुकुंदराव घरातून त्या खोलीतून बाहेर पडले व पळतच निघाले. ते मोहनकडे आले. तो तेथे कुलूप ! कोठे गेला मोहन? मायेचं समाधान करायला गेला का?
मुकुंदराव पुन्हा निघाले; तो तिकडून मोहन येत होता.
''काय रे मोहन, कोठे गेला होतास?''
''शांता प्रसूत झाली. पोट दुखू लागलं म्हणून तिला दवाखान्यात नेलं. तेथेच आहे. मुलगी झाली.''
''क्रांती जन्माला आली. आजची केवढी काळरात्र ! अशा काळरात्रीच क्रांती जन्मते. काळीकुट्ट रात्र. जणू कधी न संपणारी अमर रात्र.'' मुकुंदराव म्हणाले.