असे का त्या आपोमाता म्हणत होत्या? कोणाला कळणार त्यांची भाषा? कोणाला कळणार त्यांच्या अथांग अंतरंगातील भावना? गावे वाहत होती, लोक बुडत होते, गाईगुरे वाहून चालली होती एवढे खरे. अस्पृश्यांना दूर ठेवीत होते का? भद्र लोक त्या गरिबांना तुच्छ मानीत होते का? ते पाहा. पद्मेने सारे आपल्या  विशाल हृदयापाशी एकत्र धरले. आपल्या लाल पदराखाली तिने सर्वांना झाकले. आपली लाल शाल तिने सर्वांवर घातली. सर्वांना एक रस पाजला. ''दूर दूर पाहून भांडत बसता का काटर्यांनो? या तुम्हाला ऐक्य शिकवते.'' ती म्हणाली. लांबवर हात पसरून तिने सर्वांना जवळ ओढले. दाढी व शेंडी एकत्र आली. स्पृश्यास्पृश्य एकत्र आले. श्रीमंत-गरीब आले. ते सनातनी लंबोदरशास्त्री अस्पृश्य राखालबरोबर मातेच्या विशाल पाळण्यात शांतपणे एकत्र झोपत होते. सारे एका पाळण्यात आंदूळले जात होते. माता रागारागाने गाणी म्हणत होती. जिवंतपणी ऐक्य नसेल शिकायचे तर मरणाने शिका.

ते पाहा पाळणे वाहून येत आहेत. ते रिकामे आहेत का त्यात कोणी आहे? ती मुले आहेत. त्यातून मुले हसत आहेत. मातेच्या विशाल पाळण्यावर त्यांचा छोटा पाळणा डोलत होता. त्यांच्या गरीब मातांना त्यांना आंदुळायला. जवळ घ्यायला वेळ नसे म्हणून पद्मेने ते काम उचलले. कोठे जाणारे हे छोटे पाळणे? पद्मा त्यांना आपल्या महान पतीकडे घेऊन जाणार. रत्नाकराला ती सांगेल,''ही पाहा अनाथ बाळे. यांच्या पाळण्यावर राघू नाहीत. मैना नाहीत, ही गरिबांची मुले आहेत. यांच्या  पाळण्यावर खेळणी नाहीत. नाथ, मोत्यांचे गेंद यांच्या पाळण्यावर लावा. पोवळयांच्या वेलांचे दोर करा. सुंदर सजवा हा यांचा पाळणा.''

ही पाहा गंमत. कोण आहे ते? कैलासावरून भगवान शंकर वाहत आले की काय? नदीवर तरंगत आले की काय? उंच डोंगरावरून खालीसे उतरले? पाण्याच्या तरंगावर का तांडवनृत्य करणार? परंतु झोपलेले दिसतात. किती साप आहेत आज अंगावर. अरे, हा आणखी बघा दुसरा एक शंकराचा अवतार. शंकराने आज रूपे तरी किती धारण केली? छेः! हे शिवशंकर नव्हेत. ही साधी हिंदी माणसेच आहेत. पोलिसाला डरणार्‍यांनी आज निर्भयपणे काळे काळे साप खुशाल अंगावर सोडले आहेत ! किती हे साप ! वाहत येणार्‍या माणसांच्या अंगावर चढून ते जणू बघत आहेत.

बाळांच्या पाळण्यावर चढत आहेत. बाळांना रेशमी करगोटा देत आहेत. मुलांना चावतील का ते? नाही नाही. आज प्रेमाचा महापूर. त्यांना आज विषाची आठवण नाही. तो पाहा, तो पाहा एक कृष्णसर्प त्या उसळणार्‍या पाळण्यावर चढला. आतील मुलाच्या अंगावर वेटोळे करून बसला. सापाला ऊब मिळाली का? आता तर डोक्यावर जाऊन बसला. बघा बघा !

सापाप्रमाणे दुष्ट असणारे लोक दुसर्‍याच्या जिवावर जगतात. दुसर्‍याला खाली दडपून त्याच्या डोक्यावर नाचतात. दुसर्‍याला गुलाम करून स्वतःची हवेली बांधतात. दुसर्‍याचे वाटोळे करून स्वतः सुखात लोळतात. किसानाने निर्मावे, त्याच्यावर जमीनदारीच्या सापाने बसावे. धान्याच्या राशीला हे नागोबा हात लावू देत नाहीत. कामगाराने अगणित संपत्ती निर्मावी, त्याच्यावर पुंजीपतींनी फणा पसरून बसावे. कामगार मागू लागला तर त्याच्या अंगावर ते गरळ ओकतात. जगातील गरीब जनतेला या सापांचा ताप असह्य होत आहे. ऐक्याचा मंत्र जपून गरीब जनता या सापांना केव्हा मुठीत धरणार व त्यांचे विषारी दात पाडणार? विषाचे दात काढून टाकल्यावर हे भीषण भुजंग मग फुलांचे हार होतील, खुशाल गळयात घालावे. फुस् करण्याची पहिली सवय ते एकदम टाकणार नाहीत; परंतु ती दंतहीन फुस्फुस मग बहुजन समाजाला गमतीची वाटेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel