''तुम्ही दोघांनी असा एकमेकांस दिला होता वाटतं?'' त्याने विचारले.

''आमचं परस्परांवर प्रेम आहे की नाही हे शोधण्याची अद्याप आम्हास आवश्यकता भासली नाही.'' ती म्हणाली.

''मराठी गाणीही तू पाठ करू लागलीस?'' त्याने विचारले.

''वंदे मातरम्' चा अर्थच हा. हिंदुस्थानातील आपल्या सर्व भावांच्या भाषा आपणास थोडयाथोडया आल्या पाहिजेत. आपले आशुतोष मुकर्जी होते, ते गेले होते मद्रासच्या बाजूला. एका मित्राकडे उतरले होते. त्या मित्राच्या मुलांजवळ त्यांना बोलता येईना.  त्यांना वाईट वाटलं. आशुतोष खिन्न आहेत असं पाहून मित्रानं विचारलं,'मुलांनी गडबड केली की काय?'' आशुतोष म्हणाले, 'तुझी मुलं मजजवळ येत. परंतु मला एक शब्दही त्यांच्याजवळ बोलता येईना. तुझ्या घरी येताना तुझ्या भाषेतील चार शब्द पाठ करून आलो असतो तर या मुलांची हृदयं मी जोडली असती.'' प्रद्योत, मराठी शिकले तर ते वाईट नाही.'' माया म्हणाली.

''तोच महाराष्ट्रीय तरुण तुला शिकवितो ना?'' त्याने विचारले.

''हो. मीही त्याला बंगाली शिकविते.'' ती म्हणाली.

''त्याचेच ना ते चित्र तू काढले आहेस?'' त्याने विचारले.

इतक्यात अक्षयकुमारांनी मोठयाने हाक मारली व प्रद्योत बाहेर गेला. पित्याबरोबर विटा पाहण्यासाठी तो गेला. रमेशबाबू आत आले. माया सूत कातीत होती.
''इतकं कशाला सूत माया?'' त्यांनी विचारले.

''मला त्याचे कपडे विणून न्यायचे आहेत. सुटी तर थोडी राहिली.'' ती म्हणाली.

''माया, अक्षयबाबू सारखे पाठीस लागले आहेत. काय करायचं सांग.'' त्यांनी प्रश्न काढला.

''कशाच्या बाबतीत?'' तिने विचारले.

''जसं माहीतच नाही. मोठी लबाड मुलं तुम्ही. इतका वेळ प्रद्योत येथे होता. तू त्याला विडा करून दिलास. त्यानं तुला दिला. माया, आम्ही आता म्हातारी झालो. तुमचं दोघांचं लग्न एकदा लागलं म्हणजे आम्ही मोकळे झालो. अक्षयबाबू व मी मित्र. कधीचं आमचं दोघांचं ठरलेलं आहे की, तुमच्या दोघांचे हात एकत्र करायचे. सांग, लाजू नकोस.'' पिता म्हणाला.

''नको मला लग्न.'' ती म्हणाली.

''वेडी आहेस. विडे देता अन् लग्न नको म्हणता.'' ते हसून म्हणाले.

''बाबा, विडा देणं म्हणजे का काही अधिक अर्थ आहे? बहीण भावाला नाही देत कधी विडा करून? भटजी जेवायला आले म्हणजे त्यांना नाही देत का मी विडा करून? आमच्या निरर्थक विडयांत अनर्थ पाहू नका.'' माया म्हणाली.

''मी अर्थच पाहतो आहे.'' पिता म्हणाला.

''ते व्यर्थ आहे.'' ती म्हणाली.

''प्रद्योतचं तुझ्यावर प्रेम आहे.'' पिता म्हणाली.

''मला लग्न नको.'' ती पुन्हा म्हणाली.

''आशेनं प्रद्योत पागल बनेल. वेडापिसा बनेल. माझ्या मित्राचा तो एकुलता एक मुलगा. म्हातारपणी माझ्या मित्राला दुःख झालं तरी मीही दुःखी होईन.'' पिता म्हणाली.

''बाबा, प्रेम नसतानाही मी प्रद्योतशी विवाह करावा असे अक्षयबाबू म्हणतील का? तुम्हीही म्हणाल का? मायेने विचारले.

''माये, प्रेम पुढे उत्पन्न होतं. परिचयानं प्रेम वाढतं. कात व चुना दूर आहेत; तो रंग नाही. जवळ आले की चढला रंग.'' पिता म्हणाला.

''परंतु दोन दगड जवळ आणले तर? बंदुकीची दारू व ठिणगी जवळ आणू तर?'' ती म्हणाली.

''मी समजत होतो तुझं त्याच्यावर प्रेम आहे.'' पिता म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel