''दवाखाना रामपूरला निघणार. रामपूरला वाडा आहे. मोहन धनगावला काम करणार.'' रामदास म्हणाला.

''समजा, येथे रामपूरला शांता न आली तरी धनगावला ती काम करील. सुइणीचं काम शिकून आली तर पोटापुरतं मिळवील. मोहनची काळजी घेईल.'' दयाराम म्हणाला.

''मी शांतेला पत्र लिहितो.'' रामदास म्हणाला.

मित्रांचे असे बेत चालले होते. सोनखेडीला रामदासाची झोपडी तयार होऊ लागली. लहानशीच परंतु टुमदार अशी होती. दयाराम ती बांधवून घेत होता. हिरालाल सूचना देत होता. रामदास मुकुंदरावांबरोबर अनेक  ठिकाणी हिंडू लागला. त्याचे ठिकठिकाणी राजाप्रमाणे स्वागत झाले. त्यागाचे तेज काही अपूर्व असते. शिवतर तर त्याचे मूळचे गाव. तेथे त्याचे आई-बाप होते. रामदास आपल्या घरीच उतरला होता. बायामाणसे सारखी तेथे येत व त्याचे कौतुक करून जात.

''रामदास, श्रीमंतांच्या मांडीवर बसलास व पुन्हा भिकारी झालास !''आई म्हणाली.

''आई, असं वैभव श्रीमंताला मिळतं का? गरिबांची पिळवणूक करणारा रामदास येथे आला असता तर अशी माणसांची रीघ येथे लागली असती का? मी काही कपटे जाळले. काही कागद जाळले आणि हे वैभव जोडलं. ही अमोल हृदयं जोडली.'' रामदास म्हणाला.

''तूही शांतेसारखा एकटा राहणार का?''आईने विचारले.

''शांता एकटी नाही राहणार ! शांतेचं लग्न मी ठरवून टाकलं आहे.'' तो म्हणाला.

''बंगालमध्ये पाठवणार की काय तिला?'' तिने विचारले.

''आई, मोहनजवळ शांताचं लग्न ठरलं आहे.'' तो म्हणाला.

''मोहन ! तो माकड? तो भिकारडा?'' आई म्हणाली.

''आई, मोहनर म्हणजे मोलाचा मोती आहे. त्याच्यासमोर आम्ही लोटांगण घालावं. मोहनचा महान आत्मा आहे. तुम्हाला त्याची पारख नाही.'' तो म्हणाला.

''एका मजुराशी का शांतेचं लग्न?'' ती म्हणाली.

''आई, श्रमानं जगणारा मजूर हा ऐतखाऊ कुबेराहून अधिक अब्रूदार आहे. श्रीकृष्ण भगवान तर गाई चारी. परंतु राजेमहाराजे त्यांच्या पायावर डोके ठेवीत. मोहनच्या चरणांवर सर्वांनी डोकं ठेवावं अशा योग्यतेचा तो आहे.'' रामदास म्हणाला.

''काय म्हणाल ते खरं आणि तू करणार की नाही लग्न? संपलं की तिकडचं शिक्षण?''आईनं विचारले.

''आई, एका बंगाली मुलीजवळ मी लग्न लावलं तर चालेल की नाही? बंगाली विद्या मिळवली, बंगाली मुलगी पण मिळवतो.'' रामदास हसून म्हणाला.

''काही करा, नीट संसार करा म्हणजे झालं. वेडेवाकडे वागू नको एवढंच सांगणं.'' आई त्याच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel