मिनीसाठी किती खेळ, किती प्रकार ! सारे जग आपल्या मिनीसाठी आहे असे श्रीनिवासरावांना वाटे. मीना घोडयावर बसायला शिकली होती. तिच्यासाठी एक सुंदर घोडा घेण्यात आला होता. तिची सायकल होती. मोटार हाकायलासुध्दा ती शिकली होती. श्रीनिवासराव मिनीबरोबर कॅरम खेळत, सागरगोटे खेळत, बॅटमिंटन खेळत. मिनीबरोबर फिरायला जात. सिनेमाला जात; ते तेथे झोपी जात व मिनी त्यांना शेवटी ''उठा ना बाबा, संपला सिनेमा.'' असे म्हणत जागे करायची.

मिनी म्हणेल तो दागिना, म्हणेल तो कपडा, म्हणेल ती वस्तू, म्हणेल ते चित्र ते आणून देत. मिनीचा शब्द म्हणजे वेदवाक्य. तेथे ते विचारसुध्दा करीत नसत. ते इतरांजवळ वादविवाद करीत, पण मिनीसमोर बुध्दी पळून जाई. विचार मावळे. मिनीजवळ ते केवळ मिनीचे होत.

मिनी घरात शिके. तिला शिकविण्यासाठी एक वृध्द पेन्शनर येत असत. घरात नाना मतांची नाना वर्तमानपत्रे येत. नाना मासिके येत. सुंदर ग्रंथालय होते. नवीन नवीन पुस्तके घरी येत. मिनी हे चाखी, सारे प्राशी, ती आपल्या शिक्षकाजवळ वाद करी, पित्याजवळ वाद करी. परंतु श्रीनिवासराव नुसते हसत. मग मिनी चिडे व म्हणे, ''मी इतकं बोलते, परंतु तुम्ही काहीच बोलत नाही, बाबा !'' ते उत्तर देत, ''मैनेला बोलू द्यावं. कोकिळेला कुहू करू द्यावं.'' मिना रागाने म्हणे, ''मी मैना नाही, कोकिळा नाही, मी माणूस आहे. ही शेकडो वर्तमानपत्रं, ही शेकडो मतं, सत्य कोणतं, बाबा?''

''तुला आपोआप समजेल. सत्य आपल्या हृदयाला समजत असतं. वादविवाद करणारी बुध्दी, आतील सत्याचा आवाज आवडत नाही म्हणून बाहेर भटक्या मारू इच्छिते.'' पिता म्हणे,

पित्याचे शब्द ऐकून मिनी मुकी होई.

एके दिवशी श्रीनिवासराव व मिनी मोटारीतून फिरावयास गेली होती. कधी कधी मिनीला अशी हुक्की येत असे. ती म्हणायची,''बाबा, मोटारीत बसावं व सारखं हिंडत राहावं असं मला वाटतं. सारं जग बघावं, त्रिभुवन धुंडाळावं.'' श्रीनिवासराव हसून म्हणावयाचे, ''त्रिभुवनात काय धुंडाळायचं?'' मिनी म्हणे, ''ते मला काय माहीत? सहज हिंडावं असंच वाटतं. निर्हेतुक जगत्संचार !''

त्या दिवशी एकदम पहाटे ती उठली. तिने वडिलांस उठविले. बाहेर गार वारा वाहत होता. आकाशात तारे थरथरत होते. परंतु मिनीला थंडी नाही, काही नाही.

''बाबा, तुम्ही हे पांघरूण घ्या हं. तुम्हाला थंडी लागेल.'' मिनी म्हणाली.

''आणि तुला गं?''ते म्हणाले.

''मला आज थंडी नाही वाजत. आज माझ्या अंगात ऊब आहे. जणू उकडतं  आहे.'' ती म्हणाली.

''ताप तर नाही ना आला?'' तिच्या हाताला हात लावून श्रीनिवासरावांनी विचारले.

''छेः! ताप नाही, काही नाही. बागेतील फुलांचा कसा गोड वास येतो आहे ! आजच असा येत आहे की रोज येतो बाबा?'' तिने विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel