''बाबा, मला भाऊ नाही. प्रद्योत माझा भाऊ असं मला वाटतं. परंतु हे काय तिसरंच.'' ती खिन्न होऊन म्हणाली.
''मग का तू तशीच राहणार?'' पित्याने विचारले.

''जशी देवाची इच्छा, तसं होईल.'' ती म्हणाली.

हळूहळू प्रद्योतकडून रमेशबाबूस कळलं की, मायाचं कोणा तरी महाराष्ट्रीय तरुणावर प्रेम आहे. महाराष्ट्र व बंगाल किती दूर. माया का महाराष्ट्रात जाणार? आम्हा वृध्दांना सोडून ती इतकी दूर जाणार? माया जवळ नाही का कोठे राहणार? नाही का आम्हाला आधार होणार? रमेशबाबू सचिंत दिसू लागले. मायेच्या ते लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. एके दिवशी ती पित्याजवळ गेली व म्हणाली, ''बाबा, सचिंत का दिसता?''

''माया, आम्हाला सारं कळलं. तुझं एका महाराष्ट्रीय युवकावर प्रेम आहे. खरं ना?'' त्यांनी विचारले.

''बाबा, त्यात का काही वाईट आहे?'' तिने हळूच विचारले.

''वाईट नाही. परंतु माये, इतर गोष्टी पाहाव्या लागतात. तो तरुण बंगालमध्ये राहणार का महाराष्ट्रात राहणार? बंगालमध्ये राहणार असेल तर हरकत नाही. परंतु दूर महाराष्ट्रात तू गेलीस तर आम्हाला कधी भेटणार? जाणं-येणं हजार मैलांवर, सोपं नाही. आजारी पडलीस तर आम्ही कशी येणार? आम्ही आजारी पडलो तर तू कशी पटकन येणार?'' वडील म्हणाले.

''बाबा, आता काही प्राचीन काळ नाही. तारेनं, टेलिफोननं एका क्षणात हजारो मैलांवर बोलता येतं. आगगाडीनं दुसर्‍या दिवशी येता येतं.'' माया म्हणाली.

''विमानानं एका तासातही येता येतं. नुसतं बोलण्यात अर्थ नाही. तुला तुझ्या आईबापांचं हृदय समजत नाही.'' ते खिन्नपणे म्हणाले.

''बाबा, मुलगी म्हणजे दुसर्‍याची ठेव ना? ती ज्याची त्यानं नेणं हेच नाही का योग्य? माझ्या जीवनावर ज्याचा शिक्का, त्याचं हे जीवन ! पर्वत नदीला जन्म देतो; परंतु ती सागरासाठी धावत निघते. क्षणभरही जन्मदात्याकडे ती वळून बघत नाही. सागराची हाक तिला जन्मतःच जणू ऐकू येते. सागराने सहस्त्र करांनी वक्षःस्थलाशी धरल्याशिवाय तिला समाधान नाही. म्हणून पर्वत रागावतो का? त्याला माहीतच आहे की, ही जाण्यासाठी जन्मली आणि योग्य ठिकाणीच ती जाणार याविषयीही त्याला संशय नसतो. तो आपले आशीर्वाद तिला देत असतो. आपली पाण्याची भेट दरवर्षी तिला पाठवीत असतो. नदी सागराला मिळाली आहे हे उंच मान करून पाहण्यात पर्वताचा आनंद. नदीसाठी सागर कसा उचंबळतो व तीही त्याला कशी प्रेमाने येऊन भेटते हे पाहून पर्वत स्वतःला धन्य मानतो. खरं की नाही बाबा?'' मायेने वडिलांचा हात हातांत घेऊन विचारले.

''माये, तू म्हणतेस ते खरं. परंतु आम्हाला वाईट नाही का वाटणार तुला इतकं दूर जाताना पाहून.'' पिता म्हणाला.

''ज्याच्यावर माझं प्रेम नाही, त्याच्या घरात मी जात आहे हे पाहून तुम्हाला आनंद वाटेल का? माझं हसणं संपावं, सुख नष्ट हवं, माझी सारी अंतर्बाह्य कला मरावी असं वाटतं का तुम्हाला? मायेचं जिवंत मढं व्हावं असं का तिच्या आईबापांना वाटेल? शक्य नाही. माझे बाबा असं करणार नाहीत. आपल्या मुलीच्या जीवनाची होळी ते कसे पाहतील? माझे बाबा किती प्रेमळ, मायाळू, ममताळू. नाही, माझे बाबा कधीही मला प्रेमहीन जगात फेकणार नाहीत. खरं ना बाबा? असे कष्टी नका होऊ. हसा-मायेचं सुख पाहून हसा. बाबा लहानांच्या सुखात ना मोठया माणसांचं सुख?'' मायेने कृतज्ञतेने विचारले.

''माये, जा. कोठेही जा. सुखी राहा म्हणजे झालं. देव तुझं कल्याण करो !'' असे म्हणून रमेशबाबू उठून बाहेर गेले.
तो तेथे कोण उभं होतं?

''प्रद्योत, केव्हा आलास? पाहिल्यास का विटा?'' त्यांनी विचारले.

''कशासाठी आता विटा? प्रद्योतच्या कबरीसाठी?'' असे म्हणून तो निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel