''असे मुक्या प्राण्यांना टोकणे वाईट. पांडबा, आपल्या गावात तरी बैलाला आर टोचायची नाही का नियम करा. पंजाबात, गुजरातेत बैलाला किती प्रेमाने सांभाळतात! त्याला टोचणार नाहीत पराणीने, त्याला शिवी देणार नाहीत तोंडाने.'' शांता म्हणाली.
''मालक म्हणतो, ''आज इतकं नांगरून झालंच पाहिजे.'' मग आम्ही काय करावं ताई?''
''आपण बंड करावं. गरीब प्राण्याची बाजू घ्यावी.'' शांता रागाने म्हणाली.
''आपल्या देशात गरीब माणसाची कोणी बाजू घेत नाही, तर गरीब प्राण्याची कोण घेणार?'' शंकरने विचारले.
''आपल्या देशात मुंग्यांना साखर पेरणारे आहेत. कबुतरांना धान्य ओतणारे आहेत; परंतु माणसांना उपाशी मारतात, सावकारीनं गळा कापतात.'' गणपत त्वेषाने बोलला.
''येऊ का मग शिकायला वेळ मिळताच?''
''ये.'' शांता म्हणाली.
आता पुरुषांचा वर्गही सुरू झाला. उत्साहाने लोक शिकू लागले. गावातील भिकू सुताराने फळे करून दिले. वर्गात शांतेने चित्र लावली. मोठया अक्षरातील म्हणी लावल्या. तेथे तिने दोन नकाशे टांगले. शांताच्या उत्साहाला सीमा नव्हती. ती पहाटे उठून गावात प्रभातफेरी काढी. साक्षरतेची गाणी म्हणे. मुलेमुली त्यांत सामील होत. गावात नवजीवन आले. नवप्रकाश आला. दिवाळीमध्ये दिवे लावायचे; ज्ञानाचा दिवा हा खरा दिवा. हिंदुस्थानातील शेकडा 90 लोकांजवळ ज्ञानाचा दिवा येईल त्या दिवशी खरी दिवाळी. त्या दिवशी आत्मदेवाची दिवाळी, शांता शिवतर गावात ज्ञानाच्या शिवशंकराची, त्या ज्ञानरूप मृत्युंजयाची स्थापना करीत होती. तिने खरी दिवाळी साजरी केली. शांता आपली सुट्टी अशी दवडीत होती. परंतु रामदास काय करीत होता?
रामदासने गोविंदरावांजवळ मुंबई-मद्रासकडे जाण्याचा हट्ट धरला. हो-ना करता करता परवानगी दिली.
''बाबा, भरपूर पैसे द्या बरोबर.'' तो म्हणाला.
''किती हवेत?'' गोविंदरावांनी विचारले.
''द्या पाचशे !'' रामदास म्हणाला.
''पाचशे?'' पित्याने आश्चर्याने विचारले.
''बाबा, मी एक सायकल आणीन. एक सोन्याचे घडयाळ हवे मला ते मागे कोण आले होते पाहुणे? ते मला घडयाळ नाही म्हणून हसले. बूट आणीन छान. कपडे शिवून आणीन. बाबा, तुम्हाला पण एक छानदार अगदी तलम धोतरजोडी आणीन. शांताला आणीन काही तरी. नकोत का पाचशे? हजारसुध्दा लागतील आणि गेलोच म्हणजे चांगलेसे नाटक, सिनेमा नको का बघायला? द्या ना बाबा !'' रामदास लडिवाळपणे म्हणाला.