मध्येच ती पिशवी खाली ठेवून त्या तोंडावरून हात फिरवी. त्या डोळयांवरून हात फिरवी.. सूर्याच्या किरणांचा स्पर्श होताच मिटलेली कमळे उघडतात. मिनी मनात म्हणे,'' माझ्या गोड बोटांचा स्पर्श होऊन ही नेत्रकमळं नाही का उघडणार?''

ती मधून मधून तो हात हातातं घेई. मध्येच अंगाला हात लावून पाही. हळूहळू ते अंग कढत लागू लागले अंगात उष्णता आली. मिनीला आशा वाटू लागली. थंडगार शरीर गरम होऊ लागले. डॉक्टर आले. त्यांनी तपासले. ते म्हणाले, ''यांना आता ताप चढेल. हे बरं लक्षण आहे. परंतु ताप लवकर उतरेलच असं नाही. मनुष्याला दोन प्रकारचा धोका असतो. टेंपरेचर अगदी खाली गेलं तरी धोका. एका धोक्यातून हे वाचले. आता दुसर्‍या धोक्यातून वाचतात का पाहावं. सारखं जवळ कोणी तरी बसलं पाहिजे. ताप वाढू द्यायचा नाही. फार वाढू लागला की, लगेच बर्फाची पिशवी धरायची. यांना शुध्दही लवकर नाही येणार. ताप जाईल तेव्हाच शुध्द येईल. तोंड उघडून पाणी घालीत जा, दूध वगैरे घालीत जा. शौचास किंवा लघवीस आपोआप होईलच. मी औषध पाठवून देतो.''

डॉक्टरचे औषध सुरू झाले. मिनीची शुश्रूषा सुरू झाली. कोणी तिला शुश्रूषा करण्याचे शिकविले? तिच्या हृदयाने. मिनी आजार्‍याला क्षणभर विसंबत नसे. निजली तर एकदम दचकून जागी होई व रोग्याजवळ येऊन उभी राही. मग बाप म्हणायचा,''मिने, नीज शांतपणे. अशाने तू आजारी पडशील.''

''मी आजारी पडून हे बरे होणार असतील, तर पडू दे मला आजारी.''

''मग तुझी कोण शुश्रूषा करील? मी तर म्हातारा होत चाललो !''

''हे मग माझी शुश्रूषा करतील.'' मिनी हसून म्हणे.

त्यांना एके दिवशी मीना कोठे सापडेना. मीना कोठे आहे, मिनी कोठे आहे, पिता म्हणू लागला. मीना कोठे गेली कोणासच माहीत नव्हते. एवढया उजाडत कोठे गेली होती मिनी? आजार्‍याच्या जवळ ठेवण्यासाठी फुले आणायला का ती गेली होती? परंतु इतक्या लवकर जात नसे. मग कोठे गेली? श्रीनिवासराव कावरेबावरे झाले. तोच मिनी हळूच आली.

''मिने, कोठे गेली होतीस उजाडता?''पित्याने विचारले.

''डोंगरावरील देवीला.'' ती म्हणाली.

''आजपर्यंत कधी गेली नाहीस. आजच कुठलं हे वेड?'' पित्याने उत्सुकतेने विचारले.

''वेड लागायची एक वेळ असते, बाबा, ती वेळ आली की, सार्‍यांना वेड लागतं.'' ती म्हणाली.

कधी प्रार्थना न करणारी मिनी देवीची प्रार्थना करू लागली. आईच्या तसबिरीसमोर उभी राहून तिचे आशीर्वाद मागू लागली. त्या संन्याशाचे ती सारे करी. ती त्याला दूध देई, पाणी देई, ती त्याचे कपडे बदली. चादर बदली, ते कपडे ती स्वतः धुवी. त्यांच्या घडया घालून ठेवी. सुंदर फुले उशाशी ठेवी. रोग्याचे पाय चेपी. त्यांचे हात कुरवाळी. त्याचे अंग कढत पाण्यात टॉवेल भिजवून स्वच्छ पुसून काढी. त्याची सेवा तो तिचा मेवा होता, तो तिचा मोक्ष होता.

रोगी बरा होईल का ही मिनीला चिंता होती. ती चिंता तिच्या तोंडावर दिसे. ती फार खात-पीत नसे. नेहमी जागरण. मिनी अशक्त दिसू लागली. पिता दुःखी झाला.

परंतु एके दिवशी संन्याशाचे डोळे उघडले. त्या वेळी तेथे सारी निजलेली होती. मुक्तांचा दिवस ती बध्दांची रात्र. बध्दांची जेथे जागृती तेथे मुक्त पुरुषाला झोप. संन्याशाला काय दिसले? समोर जवळच एका आरामखुर्चीत मिनी निजली होती. तिच्या हातात संन्याशाचा हात होता. संन्यासी डोळे मिटी, पुन्हा उघडी. आपला हात कोणाच्या हातात आहे याची त्याला अद्याप जाणीव नव्हती. संपूर्ण जाणीव अद्याप यावयाची होती. परंतु त्याने आपला हात पाहिला. तो हात मोकळा नव्हता. संन्यासी अडकला होता. आपला हात हळूच सोडवून घ्यावा असे त्याला वाटले. परंतु झोपलेली सेविका जागी होईल म्हणून त्याने आपला हात तेथेच राहू दिला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel