''मी करीन ते काम. एक नम्र सेवक म्हणून या कामात पडेन. हे काम एकाचं नाही. जिल्ह्याजिह्यांत हजारो तरुण जेव्हा या व्रतानं काम करू पाहतील, तेव्हाच रंग चढेल. परंतु तोपर्यंत ठिकठिकाणी आरंभ झाला पाहिजे. वाट पाहात थोडंच बसायचं? क्रांतीला अनुकूल काल येत आहे. या वेळेसच उठावणी केली पाहिजे.'' रामदास म्हणाला.

''तिकडे संयुक्तप्रांतात, बिहारात केवढी संघटना आहे. मुकुंदराव सारं पाहून आले. तिकडची हकीगत सांगू लागले की, आपणासही ऐकूनच चेव येतो, स्फूर्ती येते. आपल्याकडेही तसं व्हावं असं वाटतं. शहरात कामगारांची संघटना; खेडयातून किसानांची संघटना; या दोन संघटना एकदा का खंबीर पायावर उभ्या राहिल्या म्हणजे काम फत्ते झालं. मग ठिणगी पडायचाच अवकाश.'' दयाराम म्हणाला.

''मोहन धनगावाला कामगारात संघटना करीत आहे. तो त्यांचे वर्ग चालवतो. तेथील कामगारांची त्याच्यावर भक्ती आहे. मोहन किती तरी काम करतो. त्याची सेवा पाहून मला लाज वाटली. मी त्याला प्रणाम करून आलो. मुनीप्रमाणे एखाद्या झोपडीत राहतो. दुपारी कामगारांच्या बायकांना शिकवतो; त्यांच्या सुखदुःखांची चौकश करतो. रात्री कामगारांना शिकवतो. सायंकाळी युनियनच्या कचेरीत तक्रारी ऐकतो. सकाळी तक्रारी घेऊन मिलमध्ये जातो. मॅनेजर वगैरेशी दाद लावण्याची खटपट करतो. फावल्या वेळात वाचतो. ज्ञान मिळवतो. जगातील कामगारांना कोणत्या सुखसोयी आहेत त्या सार्‍या त्यानं युनियनच्या कचेरीत लिहून ठेवल्या आहेत. कचेरी सुंदर आहे. कचेरी बोलकी आहे. त्या कचेरीत जाता भिंतीवरचे आकडे, भिंतीवरची पत्रकं, नकाशे सार्‍या वस्तू आपणाजवळ बोलू लागतात. दयाराम, मोहनचं काम मुकाटयानं चाललं आहे. तो बी पेरत आहे.'' रामदासाने सांगितले.

''रामदास, मोहनला जपलं पाहिजे. सेवा करता यावी म्हणून प्रकृतीची काळजी घेणं हाही धर्म आहे. सेवकानं शरीराची हयगय करणं गुन्हा आहे. पापच ते. मोहन अती श्रम करतो. तीही एक प्रकारची आसक्तीच. त्याला सांग की, 'प्रकृतीला जप. तू जगशील तर कामगारांची चळवळ जगेल.'' दयाराम म्हणाला.

''मोहनची काळजी घेणारं माणूस हवं. तो लग्न का करत नाही?'' रामदासने विचारले.

''तो लग्न लावणार नाही. आपण जिच्याजवळ लग्न लावू, ती मरेल असं त्यालाही वाटतं.'' दयाराम दुःखाने म्हणाला.

''माझ्या शांताचं त्याच्यावर प्रेम आहे. शांता शिकत आहे. अद्याप दोन वर्षं ती शिकणार. परंतु मला तर वाटतं तिनं शिकणं संपवून मोहनची काळजी घेण्यास यावं. मोहन एकटा राहिला तर दोन वर्ष जगणार नाही.'' रामदास म्हणाला.

''परंतु अर्धवट शिकणं सोडून यायचं का? सहा महिन्यांचा सुइणीचा वर्ग तरी पुरा करून यावं. तू दवाखाना चालवणार आहेस तेथे शांता काम करील.'' दयारामने सुचविले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel