१४. महापूर

महाराष्ट्रात अतिवृष्टी हाऊन पिके नष्ट झाली, त्या वेळेस बंगालमध्येही महापूर आले होते. महाराष्ट्रात पूरच आले, परंतु तिकडे महापूर आले होते. मुकुंदराव व त्यांचे मित्र यांनी इकडे किसानांत त्या निमित्ताने प्रचंड संघटना केली, जागृती केली. शेतातील पिके मेली, परंतु दुसरे संघटनेचे निर्भयतेचे-कायम टिकणारे पीक मुकुंदराव घेऊ पाहत होते. काहीसे यश प्राप्त झाले होते.

परंतु बंगालमध्ये काय? तेथे तर हाहाःकार होता. अशा वेळेस संघटना कोणाला सुचणार? आधी जगलो तर संघटना. मढयांची संघटना कशी होणार? जिकडेतिकडे मरण पसरले होते. तिकडील त्या अफाट नद्या. कधी आले नव्हते इतके पाणी. बंगालमधील जनतेस महापूराची सवय झाली आहे. रेल्वे होण्यापूर्वी तिकडे असा त्रास होत नसे. पाणी पूर्वी एकत्र फार तुंबत नसे. सर्वत्र सपाट मैदानावर पसरे. परंतु आता रेल्वे उंच रस्ता करून सर्वत्र नेली आहे. त्यामुळे इकडचे पाणी इकडे तुंबते. तिकडचे तिकडे तुंबते; मधून जाणारी रेल्वे खेडयाचा सर्वनाश बघते. पाणी भराभर वर चढते व गावेच्या गावे नष्ट होतात. तेथे वस्ती होती की नाही असे होते. कशाचा मागमूससुध्दा राहत नाही. पद्मा नदीला सर्वनाशी असे बंगाली नाव आहे. पद्मेला प्रचंड पूर येतात आणि तिच्या दोन्ही तीरांवर ते अनंत पाणी सपाटयाने पसरते. पद्मेला कधी कधी अशी सपाटून भूक लागते की, गावेच्या गावे ती पोटात साठवते, हजारो हातांनी गावांना ओढते. माणसे, पशुपक्षी, झाडेमाडे सारे खात सुटते. 'सर्वनाशी पद्मा सर्वभक्षा होते.'

पद्मा, ती लोकमाता इतकी कशी कठोर होते? गर्जना करीत, पिशाच्चाप्रमाणे केसांच्या झिंज्या सोडून ती किंकाळया मारीत येते. कडक लक्ष्मीप्रमाणे आसूड ताडताड मारीत येते. सर्वांना झोडपीत सुटते. प्रेमळ, माता लाल लाल होते. खवळते. भेसूर दिसते. दयामय स्वरूप नष्ट होऊन नारसिंह रूप प्राप्त होते.

का रागवते प्रेममयी, स्नेहमयी पद्मा? तिला वाईट वाटते. दुःखातून क्रोधाचाही कधी कधी संभव होतो. दुःखांतून निराशा जन्मते व निराशेतून कधी कधी भेसूर निष्ठुरता जन्मते. एखादी माता आपल्या दुबळया व बावळट मुलाला मारते, ''असा कसा तू अजागळ? त्यांनी मारल तर आपण मारायचे ! तुझे हात काय केळी खायला गेले होते? जातोस कशाला मग त्यांच्याकडे? तुझ्यात काहीच कसे पाणी नाही?'' असे ती मुलाला म्हणते. आपल्या मुलाने लाथा खाणारे होऊ नये. त्यानेही हात दाखवावा. पराक्रम करावा, असे तिला वाटते. म्हणून ती रागाने स्वतःच्या त्या रडक्या मुलाला मारते, त्याचा स्वाभिमान जागा करू पाहते.

पद्मेला का असेच वाटत होते? कष्टाळू बंगाली किसान शेती पिकवितात परंतु जमीनदार येतात व सारे लुबाडतात. किसान उपाशी व जमीनदार जेवी तुपाशी. अशी ही माझ्या तीरावरची बावळट मुले. त्यांचे श्रम पाहून मी प्रसन्न होते. जमिनीला ओलावा देते. परंतु या मरतुकडयांना स्वतःचे कमावलेले राखता येत नाही. स्वतःच्या श्रमाचे फळ ऐतखाऊ लोक खुशाल नेतात व हे रडत बसतात. आपल्या मुलांची ही केविलवाणी दशा त्या मातेला बघवेना. ती निराशेच्या रागाने आली व सर्वांना घेऊन निघाली. माझ्या मुलांचा जगात असा पदोपदी उपहास, अपमान, उपमर्द होण्यापेक्षा यांना मी माझ्या पोटातच ठेवते असे का ती मनात म्हणाली?

तेजाने जगायचे असेल तर जगा. स्वातंत्र्याच्या वैभवाने जगायचे असेल तर जगा. उघडेनागडे, उपाशीतापाशी, हिवतापाने वाळलेले, रोगांनी जर्जर झालेले, कर्जाने रंजीस आलेले, बेकारीने मेटाकुटीस आलेले, अडाणी व दरिद्री असे जगणार असाल तर तो मातेचा अपमान आहे. मी असे मढयासारखे तुम्हाला जगू देणार नाही. त्यापेक्षा नष्ट झालेले काय वाईट.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel