4. दिवाळी

मुकुंदराव रामपूरहून कोठे तरी निघून गेले. ''तुम्ही आम्हाला घरी शिकवा. शांती व मी तुमच्याजवळ शिकू. शाळेतील विषयच नकोत. जगातील विषय शिकवा. आमच्याबरोबर 'हरिजन' वाचा, 'सत्याग्रही' वाचा, 'क्रांती' वाचा. 'स्वतंत्र हिंदुस्थान' वाचा. आम्हाला विचारांचं भरपूर खाद्य द्या.'' असे रामदास त्यांना म्हणाला होता. परंतु ''काही दिवस कोठे तरी जाऊन येतो,'' असे ते म्हणाले.

दिवाळीची सुट्टी लागली होती. शांता आपल्या खेडेगावातील घरी गेली. तिच्या गावाचे नाव 'शिवतर.' शिवतर गावाला मराठी शाळाही नव्हती. गावात लिहिणारा वाचणारा क्वचित असे. गावात अज्ञान होते, तसे दारिद्रयही होते. गावाची जमीन सावकारांची, जमीनदारांची, गोविंदराव चव्हाणांची येथे बरीच जमीन होती. काही गुजराती व मारवाडी सावकारांची होती. इतरही सावकार छोटे-मोठे होते. गावात सारे भित्रे. तसे ते समोर वाघ येता तर त्याला काठीने मारते; परंतु साधा पोलीस आला तर ते घाबरत. इंग्रजी राज्यातील हा आमचा सर्वांत मोठा अधःपात. आत्मा जणू चिरडला गेला. वाघाच्या इंगळासारख्या डोळयाला नजर देणारे शेतकरी पोलिसांच्या काळया डगल्याला, त्या लहानशा दंडुक्याला भितात आणि मामलेदार म्हणजे तर काही विचारूच नका.

प्रकाशाशिवाय अंधार कसा जाणार? सूर्योदयाशिवाय धुके कसे जाणार? औषधाशिवाय रोग कसा हटणार? प्रेमाशिवाय कलह कसे मिटणार? आणि ज्ञानाशिवाय भीती कशी जाणार? रामनाम म्हटले म्हणजे भुते जातात. जीवनात राम आला म्हणजे कोणता सैतान समोर उभा राहील? ज्ञान म्हणजे रामनाम. स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव म्हणजेच रामनाम.

शांतीला वाटले, आपल्या गावातील बहिणींना शिकवावे. ती घरोघर जाई व प्रेमाने बोले. तुम्ही लिहायला-वाचायला शिका असे सांगे.

''शांते, आम्हाला शिकून मडमीण का व्हायचं आहे?'' एक भगिनी म्हणाली.

''आम्हाला का नोकरी करायची आहे?'' दुसरीने विचारले.

''नोकरीसाठी नाही शिकायचं. मडमीण होण्यासाठीही नाही. परंतु मडमीण साता समुद्रापलीकडून एकटी येते. कशाच्या जोरावर? ज्ञानाच्या? ज्ञानामुळे ती निर्भय असते. तुम्हाला रेल्वेनं कोठे जायचं झालं तर बरोबर कोणी हवं. आधीच गरीब, परंतु दुप्पट खर्च असा होतो. तिकीट कोठलं ते वाचता येत नाही. स्टेशन कोणतं ते कळत नाही. तिकीटाची किंमत किती ती समजत नाही. यासाठी शिका.'' शांता म्हणाली.

''खरंच की शांता, आम्हाला जायचं होतं नगरदेवळयाला, तर उतरू पडलो कागावला. कोण फजिती !'' शांता म्हणाली.

''आणि आम्हाला पंढरपूरला जाताना तिकीटाची किंमत जास्त घेतलीन् त्या मास्तरानं. म्हणे कसा, एकादशीला तिकिटं महाग होतात !'' आनसूया म्हणाली.

''एकादशीला का तिकिट महाग होतं? शेंगाचे दाणे महाग होतात, खजूर महाग होतो.'' आनंदी म्हणाली.

''परंतु आपलं अज्ञान. त्यामुळे फसतो. त्या पाचोर्‍याच्या बाजारात माळणी भाजी विकायला बसत. एक पोलीस दादा येई व उचली वांगी, उचली कांदे, उचली मिरच्या. परंतु एक माळीदादा तेथे होता. त्याच्या वांग्यांना हात लावताच तो म्हणाला,''नाव टिपीन, नाही तर ठेव खाली वांगी.' तो पोलीस घाबरला. पुन्हा त्याची पिडा आली नाही.'' ''पिडा कशानं गेली?'' शांताने विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel