८. शांता, तू शीक.

गोविंदरावांनी रामदासला सुटीत बोलाविले. परंतु तो आला नाही. मी इकडेच हिंडणार आहे, अनाथाश्रम, खादीप्रतिष्ठान वगैरे संस्था पाहणार आहे, असे वडिलांस त्याने कळवले. आपण घरी गेलो तर आपल्या लग्नाचेही प्रश्न निघतील. उगीच घोटाळे नकोत, हाही एक विचार घरी न जाण्यात होता. भाऊ येणार नाही म्हणून शांतेला मात्र वाईट वाटले. मधून मधून त्याचे पत्र येत असे. परंतु अलीकडे बरेच दिवसांत शांतेला पत्र आले नव्हते. भाऊ विसरला का गरीब बहिणीला ! भाऊला भुलविले का कोणी बंगाली जादूगारणीने?

शांता शिवतरला गेली. मॅट्रिकची परीक्षा देऊन ती आली होती. मोहन आला पुरुषांचा वर्ग घेई. शांता बायकांचा वर्ग घेई. मोहन वेळ होताच शांतेजवळ येई व नवीन नवीन नवीन काही शिके.

एके दिवशी रात्री रामराव, शांता व तिची आई, बोलत होती. शांतेच्या लग्नाची ती चर्चा होती.

''बाबा, मला शिकू दे. पुष्कळ शिकू दे. जगातील ज्ञान मिळवू दे. शांतीचे पंख तोडू नका. तिचे पाय बांधू नका.'' ती दुःखाने म्हणाली.

''पुष्कळ शिकलीस. गोविंदराव म्हणतात तर का न ऐकावे? चांगला सरदाराचा मुलगा. घरंदाज दिसतो. रुबाबदार. त्याच्याशी लग्न लावायला काय हरकत आहे? मागील वर्षी आम्ही सांगितलं वडिलांना त्याच्या, की एवढी मॅट्रिकची परीक्षा होऊ दे. पुढील वर्षी बार उडवू. शांता हट्ट करू नकोस. गोविंदरावांचे आपण ऋणी आहोत. हजार-दोन हजार त्यांचं कर्ज आहे. त्यांची इच्छा आपण मोडू तर कसं व्हायचं? आणि पुढे शिकू म्हणतेस तर कोण देणार मदत? गोविंदराव मग का मदत करतील !'' रामराव म्हणाले.

''भाऊ पाठवील मदत. मी त्याला लिहीन.'' शांता म्हणाली.

''भाऊ तरी कोठून देणार? गोविंदरावांचेच पैसे ना? श्रीमंतांचा तुम्हाला इतका  तिटकारा तर त्यांचे पैसे तरी कशाला?'' पिता म्हणाला.

''ते पैसे श्रीमंतांचे नाहीतच. त्या पैशावर देवाघरी गरिबांचा शिक्का असेल.'' शांता रागाने म्हणाली.

''देवाघरी काय असेल ते देव जाणे. येथील जगात तर ते त्यांचे पैसे आहेत.'' ते म्हणाले.

''हे जग आम्ही बदलू. उलथापालथ करू.'' शांता म्हणाली.

''काय दिवे  लावाल ते दिसेल. सरकार देईल अंदमानात पाठवून. मग बसाल रडत. सुखाचा संसार करायचा सोडून अवदसा आठवते तुम्हाला.'' बाप चिडून म्हणाला.

''बाबा, आजूबाजूस हजारोंच्या संसाराची धूळधाण होत असता आपण का सुखाचा संसार करीत बसावं?'' शांतेने विचारले.

''मला ते समजत नाही. तू लग्न करणार नसशील तर पुढे काय करणार? कोण शिकवणार?'' बापाने पुन्हा विचारले.

''मी काहीही करीन. परंतु हे लग्न नको. म्हणे रुबाबदार आहेत. भाऊच्या दत्तकाच्या वेळेस पाहिले आहे मी त्यांना. कुलंगी कुत्रा गुबगुबीत दिसला, त्याच्या कानात भिकबाळी घातली, गळयात कंठी घातली, तरी तो सिंह होत नाही. लाळघोटया कुत्र्याजवळ का लग्न करू? एवढया सरदाराचा लेक परंतु तेथे एक अधिकारी आले होते, तर किती सारखा गोंडा घोळीत होता. तिळभर स्वाभिमान नाही त्यांना. यापेक्षा एखाद्या मजुराजवळ लग्न लावणं काय वाईट?'' शांता म्हणाली.

''लाव बाई, मजुराजवळ लग्न व बांध झाडाला पाळणा. ठेव बांधावर मूल आणि कर शेतात काम.'' आई म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel