पारशी मंडळी हसू लागली.

''वेडा बिचारा!'' पारशी पिता म्हणाला.

''मिळो त्याला त्याची मुलगी.'' पारशी माता म्हणाली.

''आई, माझ्याहून का त्याची मुलगी सुंदर असेल?'' मुलीने विचारले.

''बेटा, ज्याचे त्याचे त्याला प्रिय.'' माता म्हणाली.

त्या दिवशी रात्री श्रीनिवासराव उठले. त्यांनी तिजोरी उघडली. ते नोटा मोजीत बसले. हजाराहजारांची पुडकी होती, ''मिने, हे सारं तुझ्यासाठी. ये व घेऊन जा. तुला वाटेल त्याला दे. हे कपटे मला काय करायचे? हे कागद तुझ्यासाठी गोळा केले आणि तू निघून गेलीस. ही सारी संपत्ती गरिबांना वाटावी मनात येतं. परंतु मिने, तुझ्या हातानं दिलं जावं अशी माझी इच्छा आहे. हात तुझे लांब आहेत. आजानुबाहू आहेस तू. शुभ लक्षण समजतात हे. ये, तुझ्या हातानं गरिबांना सुखव, दुःखितांना हसव. हजारो दरिद्री नारायण माझ्या मिनीला दुवा देत आहेत. मला बघू दे तो देखावा, ऐकू दे ते आशीर्वाद. दीनांचा दुवा म्हणजे देवाचा आशीर्वाद. ये मिने, ये. तुला ते कागद खेळायला हवे असले तरी घे. याचा पतंग करून उडव. मीच उडवू का हे वार्‍यावर? कबुतरं युध्दात निरोप देतात. हे कपटे माझा निरोप तुला नाही का सांगणार? वारा ही माझं पत्र तुला नाही का देणार? परंतु वारा तर रोज माझ्या अश्रूंची कथा तुला सांगत असेल. का त्यानंही काही माझ्याविरुध्द कट केला आहे? कोणास माहीत. बसा. निर्जीव पुडक्यांनो, बसा येथे. मिनी आली म्हणजे हसा आणि निर्जीव लोकांना सजीव करण्यासाठी जा झोपडयाकडे धावत, समजलं ना?'' असे म्हणून पुडकी ठेवून ते झोपले.

गावातील लहानथोरांस श्रीनिवासरावांची करुणा येई. त्यांची दशा पाहून माता सद्गदित होत. पिते डोळे पुशीत. झाडेमाडे, पशुपक्षी खिन्न होत. सारी सजीव-निर्जीव सृष्टी म्हणे, ''प्रेमळ पित्या, येईल. एक दिवस तुझी मिनी येईल. पित्याची पवित्र प्रेमळ इच्छा पुरी होईल.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel