असा हा पेटता प्रचार अहोरात्र चालला होता आणि तो स्वातंत्र्याचा दिवस आला. गावोगावांहून किसानांच्या दिंडया निघाल्या. शिंगे बरोबर होती. झेंडे फडकत होते. गाणी दुमदुमत होती. अनेक ठिकाणांहून किसान बाया पायी निघाल्या. शिवतरहून शांता निघाली. शांतेच्या हातात लाल झेंडा, गीतेच्या हाती तिरंगी झेंडा. शेकडो स्त्रिया निघाल्या. विद्यार्थ्यांची पथके बँड घेऊन निघाली. कामगार शिस्तीने गाणी गात निघाले. करमपूर गावी जमण्याचे ठरवले होते. तेथील प्रचंड वटवृक्षांच्या सावलीत सभा झाली. शेकडो झेंडे झाडांवरून लावण्यात आले. वडाच्या झाडावर लाल फळे होती. जणू त्या विशाल वृक्षाच्या पानांपानांतून रोमारोमांतून लाल झेंडे बाहेर पडत होते. संघटनेचे विराट दर्शन झाले. स्वतःची शक्ती शेतकर्‍यास कळली. कर्ज रद्द झाले पाहिजे; खंड कमी झाला पाहिजे; तहशील निम्मा कमी झाला पाहिजे; कामगारांना कामाची शाश्वती हवी व त्यांना पगारी रजा आणि म्हातारपणी पेन्शन मिळाले पाहिजे, वगैरे ठराव झाले आणि यंदा अतिवृष्टीने पिके बुडाल्यामुळे भरपूर प्रमाणात सूट मिळाली नाही, तर करबंदी सुरू करू असा, ठराव करण्यात आला. किसानांच्या घरांतून खाटा, पोळपाट, लाटणी, झोऱ्ये, सुताडे अशा वस्तूही जप्त करून सारी अब्रू घेतली जाते या गोष्टीचा निषेध करण्यात येऊन किसान अतःपर हा अपमान सहन करणार नाही, गावोगांव शांतपणे याला अनत्याचारी प्रतिकार केला जाईल असेही गंभीरपणे जाहीर करण्यात आले.

सभेत अनेक किसान व कामगार-कार्यकर्त्यांची भाषणे झाली. बहुजनसमाजातील तरुण कार्यकर्ते या चळवळीमुळे पुढे आले. त्यांची संघटना झाली. स्त्रियांचा आत्मा जागा झाला. किसान, कामगार व विद्यार्थी असा त्रिवेणी संगम झाला.

समारोपात मुकुंदराव म्हणाले,''आपणास उद्याच काही मिळेल असं नाही. परंतु आपण निर्भय झालो. अमोल अशी निर्भयता प्राप्त करून घेतली. हे पाहा वटवृक्ष ! कसे खंबीरपणे उभे आहेत ! कोण त्यांना उपटील? हे पाहा हजारो त्यांचे तणावे ! आपली संघटना अशीच बळकट होऊ दे. तरच सुखाची छाया मिळेल. सारे एक व्हा. गावोगांवची क्षुद्र भांडणे विसरा. त्याचा बैल माझ्या बांधावर आला, ने कोंडवाडयात, असे प्रकार नका करू. साम्राज्यशाहीचा व भांडवलशाहीचा मुख्य बैल आपणास शिंगे मारीत आहे, त्याला वेसण घालू या. त्या बैलाला शरण आणू या. गावात हरिजन असतील त्यांनाही जवळ घ्या. उद्या सावकारांच्या जमिनी कसावयाच्या नाहीत असं ठरविलं, तर तुमच्यावर रागावलेले हरिजन त्या जमिनी कसतील. श्रमजीवी जनतेत फाटाफूट असात कामा नये. श्रमणारे सारे एक हा मंत्र विसरू नका. हा खरा धर्म. आपआपल्या गावातील शेतमजुरांना नीट वागवा. त्यांना नीट पोटाला पुरेशी मजुरी द्या. तुम्हाला त्यामुळे अधिक खर्च येईल; पण सरकारला जास्त ठासून बजावता येईल की, तहशील निम्मे कमी करा. आम्हास शेती परवडत नाही. अशा रीतीनं पाऊल टाकू या. एकमेकांच्या दुःखासाठी धावू या. कामगारांचे प्रश्न आले, किसान धावले पाहिजेत. किसानांचे प्रश्न आले, कामगार उठले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी सर्वांना सहानुभूती दाखविली पाहिजे. संघटीत व्हा. गावोगांव अभ्यास मंडळं निर्मा. विचार मिळवा. स्त्रियाही शिकू देत. स्त्रियांना तुच्छ नका मानू. सर्व प्रकारची गुलामगिरी आपणास नष्ट करावयाची आहे. सर्वांची मान उंच करावयाची आहे. या जगात कोणी तिरशिंगराव नको, कोणी दीनवाणा नको. सर्वांची सरळ मान असू दे. सर्वांना सुखसमाधान लाभू दे आणि शेवटी सांगतो, अनत्याचारी राहा. शांतीने क्रांती करा. तर ती क्रांती होईल.''

सभा संपल्यावर बरोबर आणलेल्या भाकर्‍या लोकांनी खाल्ल्या. रात्री पोवाडे झाले. संवाद, मेळे, नाटयप्रवेश वगैरे कार्यक्रम झाले. सर्वांना आनंद झाला. स्वातंत्र्य दारी आले असे वाटले. स्वातंत्र्याचा सूर्य दिसत नसला तरी तांबडे फुटत आहे, अंधार पळत आहे, याविषयी कोणासही शंका राहिली नाही. यथार्थतेने स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel