त्या मातेची ती आशा पाहून मुकुंदरावांचे डोळे भरून आले. दहा वर्षांनी का होईना, मुलाला जमिनीचा तुकडा मिळेल या आशेवर ती सुखाने जगणार होती. सुखाने मरणार होती. किती आनंदानं विचारलं, ''खरंच का परत मिळेल? म्हणून ! किती कोमल दिसत होते तिचे तोंड ! जसा काळया ढगाच्या पाठीमागे चंद्र असावा; म्हणजे जसे त्या ढगाचे सौम्य रूप दिसते तसे तिचे तोंड त्या वेळेस दिसले !! किती आशा-थोडीशी सहानुभूती मिळाली तरी केवढे समाधान !

ती माता निघून गेली.

''सावकारांनी यंदा लिलाव भराभर चालविले आहेत. हे लिलाव तहकूब करावयास पाहिजे होते. दरवर्षी अशी जप्ती-वॉरंटांची गर्दी नसते. परंतु पुढे-मागे कर्ज-कायदा वगैरे होईल म्हणून आधीच सावकार उठले आहेत.'' राघो म्हणाला.

''लिलाव थांबवा, म्हणून लाखो किसानांनी ओरड केली पाहिजे. विराट सभा भरविल्या पाहिजेत. घरात रडून काय होणार? भय-भीती सोडा. ऐवीतेवी मरायचं, तर झगडा तरी करू या. पाटलाचं भय, तलाठयाचं भय, पोलिसांचे भय, मामलेदाराचं भय, या सर्वांचा त्याग केला पाहिजे. हे आपले नोकर आहेत, आपण धनी आहोत, या भावनेनं राहिलं पाहिजे. करू या आपण चळवळ. लिलाव थांबवा, कर्ज रद्द करा, खंड कमी करा, शेतसारा कमी करा, अशा आपल्या मागण्या. या मागण्यांवर जिकडे, तिकडे खळबळ करू या. पेटवू या सारा देश. उठाल का तुम्ही?'' मुकुंदरावांनी विचारले.

''हो, उठू. तुम्ही उभे राहा. आम्ही तुमच्या मागं आहोत. हजारो शेतकरी जमतील.'' नारायण म्हणाला.

मुकुंदराव प्रचार करू लागले. आसपास हिंडू फिरू लागले आणि त्यांना निसर्गाचीही मदत मिळाली. ते आले तेव्हा पीक जरा बरे होते. शेतकरी सुखी होता. परंतु एकाएकी प्रचंड पाऊस सुरू झाला. काही केल्या थांबेना. कपाशीची बोंडे झडून गेली. ज्वार्‍यांचा फुलोरा गेला. भुईमुगाला कोंब फुटले. बाजर्‍या झडल्या. हाती आलेले वाहून गेले. शेतकरी दीनवाणा झाला. नद्या-नाल्यांना भरमसाठ पाणी आले व ते आसपास दूरवर पसरले. शेतांतून रेती येऊन बसली. शेते फुकट गेली. किती घरे पडली, किती झोपडया पडल्या, त्याचा पत्ता नाही. पाणी पडत होते. मजुराला काम मिळेना. घरी दाणा नाही. चूल तीन तीन दिवस घरात पेटेना. घरात ओल यावी, थंडी वाजावी, परंतु विस्तव करायला घरात कोरडी ढलपी नसावी ! भिजलेलेच कपडे अंगावर. अंगातील थोडयाफार उष्णतेने ते अंगावरच वाळत. गोरगरिबांची दैना झाली.

ओला दुष्काळ पडला. गुराढोरांना पाणी मुबलक झाले. चाराही त्यांना होता. परंतु माणसाला दाणा उरला नाही. असे होते तरी सरकारला दाद नव्हती. त्याचे जे एकदा वर पूर्वी अहवाल गेले, 'पीक बारा आणे, दहा आणे,' तेच कायम. ब्रह्मदेव लिहिलेलं बदलेल, परंतु येथे खाली बदलत नसते. पाटील-तलाठयांना हुकूम आले, ''शेतात जाऊन किती कैर्‍या कापसाच्या गळलेल्या दिसतात ते पाहा.'' शेतात कैरी गळलेली दिसेना, बोंडे पडलेली दिसत ना. बोंडं का तेथे पडलेली दिसतील? पाण्याबरोबर वाहून गेली ती. परंतु साहेबाचे डोके कसे चालेल त्याचा नेम नसतो.

ज्वारीची कणसे मोठी दिसत. आत मात्र दाणा भरलेला नाही. साहेब विचारी, ''कणीस दिसतं की नाही?'' पाटील, तलाठी बिचारे म्हणत, ''होय साब, मोठं कणीस आहे !''

सरकारी अधिकार्‍यांना वरून हुकूम सुटले की वर्ष कठीण आहे. ताबडतोब तगादे लावा. दरसाल तहशील डिसेंबर-जानेवारीत घेत, यंदा ऑक्टोबरपासून तगादे ! कारण दुष्काळ होता म्हणून. शेतकर्‍यांची गायीगुरे जप्त होऊ लागली. घरातील खाटा, पाटे-वरवंटे, पोळपाट-लाटणी चावडीवर लिलावाला जाऊ लागली. गाडया जप्त झाल्या. घरातील झो-येसुताडेही जप्त झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel