''करू जिवाचा धडा, फोडू साम्राज्यशाहीचा घडा.''
''त्याला गेला आहे तडा, आधीच कोणी मारला आहे खडा.''
''सारा किसान राहील खडा, स्वातंत्र्याच्या गडा.''
ते तरुण काव्य करू लागले. स्वातंत्र्याचे संगीत त्यांच्या रोमारोमांतून नाचू लागले.
''मी जातो. पुन्हा कधी भेटेन देव जाणे.'' मुकुंदराव त्या तरुणांना म्हणाले.
''तुम्हाला भेटायला तुरुंगात येऊ. वर स्वर्गात येऊ.'' ते म्हणाले.
मुकुंदराव निघाले. बैलांना फार टोचतात म्हणून ते बैलगाडीत बसत नसत. ''तुम्ही बैलांना फार टोचता, फार मारता. बैलांना जोपर्यंत तुम्ही टोचता तोपर्यंत साम्राज्य सरकार तुम्हाला टोचील.'' असे ते म्हणत. ते नेहमी पायी जायचे. परंतु आज बराच पल्ला गाठावयाचा होता. ते झपझप जात होते. क्रांतीची गाणी गात जात होते. त्या गाण्यांच्या पंखांनी जणू ते उडत जात होते. ते चालत आहेत का उडत जात आहेत ! मुकुंदरावांचा आत्मा धुळीतून चालण्यासाठी जणू नव्हता. तो चिदंबरात उडण्यासाठी होता. त्यांच्या जीवनात ओढाताण होती. आत्म्याची उसळी वर होती. परंतु ही देहाची खोळ खाली ओढी. आत्मा उंच उडू बघे. परंतु देहाचे वजन खाली खेची. जीवनातील ती ओढाताण, ती धडपड, त्यांच्या त्या चालण्यात दिसत होती.
त्यांनी प्रथम रामपूरचा रस्ता घेतला. परंतु काही मैल चालून गेल्यावर त्यांचा बेत बदलला. रामपूरपेक्षा धनगावलाच जावे, त्यांच्या मनात आले. रामदासला पकडून धनगावला नेले असण्याचा अधिक संभव होता. रामपूर का धनगाव? देहपूर सुटले नाही, तोवर कुठले रामपूर?
त्यांनी पावले वळविली. धनगावकडे ते निघाले. दहा कोस जावयाचे होते. तिसरा प्रहर होत आला होता. ते खूप वेगाने जात होते. एकदम गार वारा सुटला. पावसाची चिन्हे दिसू लागली. त्यांनी वर आकाशात पाहिले तो ढग गोळा होऊ लागले. जणू कोणी मोठा मेंढपाळ हजारो मेंढया, बकर्या, कोकरे घेऊन चालला होता. का आकाशात मोठी सर्कस उतरली होती? किती प्रकारची ही जनावरे? सिंह आहेत, वाघ आहेत, हत्ती आहेत, ससे आहेत, कुत्रे आहेत. रानटी व माणसाळलेली दोन्ही प्रकारची जनावरे तेथे होती आणि ते पहा भुजंग. शेकडो फणांचे भुजंग. मध्येच त्यांच्या फणांचे मणी जणू चमकत व डोळे दिपत. सर्कशीत सापाचेही खेळ आहेत वाटते. कोणी गारुडीही सर्कशीत आहे वाटते. सापांना अंगावर खेळवणारा कोणी अमेरिकन थोरो त्या वरच्या सर्कशीत होता का?
वरचे देखावे पाहून मुकुंदरावांच्या मनात असे नाना विचार, अशा नाना कल्पना येत होत्या. पावसाने गाठू नये म्हणून ते अधिकच वेगाने जाऊ लागले. दुरून पाऊस पडल्याचा वास येऊ लागला. गंधवती पृथ्वीचा सुगंध वार्यावर येऊ लागला. आकाश आपल्या धारांच्या बोटांनी पृथ्वीराणीला गुदगुल्या करू लागताच तिच्या रोमारोमातून जणू सुगंध बाहेर पडतो. येणार, पाऊस येणार व मला गाठणार असे मुकुंदरावांना नक्की वाटलं, तरी ते धावपळ करीतच होते. बाहेर अंधार पडू लागला. मेघांचा अंधार व रात्रीचा अंधार. दोघांचे मीलन होऊन अधिकच गंभीर अंधःकार पसरणार होता.
मुकुंदरावांच्या छातीत एकाएकी कळ आली. बरेच दिवसांनी ती कळ आली. ते एकदम बाजूला मटकन बसले. भूमातेच्या मांडीवर लोळले. छाती घट्ट धरून ते पडून राहिले. पाऊस जोराने येणार होता. चिंता करून काय होणार? मुकुंदराव मुकाटयाने डोळे मिटून पडून राहिले.