''मी राहतो तेथे पुष्कळ जागा आहे; घोडा बांधता येईल. पावसाळयात पत्रा लावता येईल.'' तरुण म्हणाला.
''तुमचं जेवणखाण वगैरे? तुम्हाला किती खर्च येईल?'' शांतेने विचारले.
''माझा खर्च मी करीन.'' तो म्हणाला.
''नाही तर आमच्याकडे येत जा जेवायला.'' शांता म्हणाली.
''मी सदैव हिंडणार; कसं जमणार जेवणाचं? एखादे वेळेस येत जाईन. तुमच्या पवित्र आनंदात वाटेकरी होईन. ठरलं तर मग. आता एक घोडा आणा खरेदी करून.'' तरूणाने सांगितले.
''भाऊला विचारू. भाऊजवळ असेलही घोडा. मुकुंदराव हिंडतात; फिरतात, त्यांनाही विचारू.'' शांता म्हणाली.
तो तरुण गेला. रामदासने खरोखरच एक घोडा पाठवून दिला. तो तरुण आनंदला. त्याचा कार्यक्रम सुरू झाला. दिवसभर तो हिंडे. गावोगाव जाई, खादीची गोड गाणी गाई. लोकांना खादी घ्या म्हणे. त्याच्याभोवती गर्दी जमे. त्याच्याबद्दल लोकांना एक प्रकारचे कुतूहल वाटे. तो पायजमा घाली. अंगात एक जाडसर लांब कोट असे. त्याला गळपट्टीपासून बटणे असत. डोक्याला तो सुंदर रुमाल बांधी व त्याचा झेंडा पाठीवर सोडलेला असे.
''नाही मग कोणीच खादी घेत? फुकट झाली माझी फेरी? नाही कोणी या गावात सत्त्वाचा, त्यागाचा, बंधुप्रेमाचा? सारा गाव का फुकट?''असे तो कळकळीने, प्रेमाने विचारी.
''नका निराश होऊ. द्या मला दोन चार शर्टापुरती.'' कोणी एकदम पुढे येऊन म्हणे.
''मला त्या एक टोपी.'' एखादा मुलगा पुढे येऊन म्हणे.
''तुम्हाला नाही म्हणणं वाईट वाटतं. द्या मला एक धोतराचं पान.'' एखादा पोक्त शेतकरी येऊन म्हणे.
निराश तरुण हसू लागे. त्याच्या डोळयांत एक मंगल प्रेममय तेज फुले.
''आम्हाला गाणी द्या टिपून.'' मुलेमुली पाठीस लागत.
''खादी थोडी घ्या; मग देतो गाणी.'' आमचा हा घोडे स्वार म्हणे.
''पुन्हा याल तेव्हा खादी घेऊ, आज गाणी द्या.'' मुले म्हणत.
''आज गाणी देतो, पुढे खादी देईन. फसवू नका हं. लहान मुलं फसविणार नाहीत.'' तो हसून म्हणे.
''फसवलं तर?'' मुले विचारीत.
''मग मी रडत बसेन.'' तो म्हणे.
'''नाही फसवलं तर?'' मुले हसून विचारीत.