ती आता खिन्न दिसे. तिचे ते हसणे जणू अजिबात मेले. ऐके दिवशी ती एके ठिकाणी दळण्यासाठी गेली होती. ती दळीत होती. तिच्या डोळयांतून पाणी गळत होते, ते पीठात पडत होते. घरांतील सोवळया आजीबाईंनी ते पाहिले.
‘मधुरी, अग डोळयांतील पाणी त्या पीठात पडत आहे ना? सारे पीठ खरकट झाले. काय तरी बाई. पूस ते डोळे आधी. गरिबाच्या पोटी कशाला आलीस? दळावे लागते म्हणून रडावे? आचरट आहेस!’
मधुरीने डोळे पुसले. डोळयांतील पाण्याने भिजलेले थोडे पीठ बाजूला काढले.
‘आजीबाई, रागावू नका. आईला सांगू नका. सारे पीठ नाही हो खरकटे झाले. चिमूटभर बाजूला काढले आहे. आता न रडता दळते. असे ती म्हणाली. दळण संपवून ती घरी जात होती. तो वाटेत कोण? तो बुधा होता. आज कित्येक दिवसांनी तो घराबाहेर पडला होता. आणि मधुरीचे दर्शन झाले. त्याच्या हातात एक फूल होते. गुलाबाचे फूल.
‘मधुरी!’ त्याने हाक मारली.
‘काय बुधा?’ त्याने विचारले.
‘तू मला विसरली नाहीस?’
‘नाही.’
‘तू मला विसरणार नाहीस?’
‘नाही.’
‘तुझे माझ्यावर प्रेम आहे?’
‘हो.’
‘मग घे हे फूल.’
‘बुधा!’
‘काय मधुरी?’
‘मी ऐकले होते की, तू खोलीतून बाहेर पडत नाहीस; परंतु तू तर बाहेर दिसलास आणि हातात फूल घेऊन जात होतास. असाच आनंदी राहा. फुलांचा वास घे. तुला फुलांचा तोटा नाही. सुंदर सुगंधी फुले, त्यांचा तू भोक्ता हो.’
‘मधुरी!’
‘काय?’