‘बरे येईन. ज्यात तुझा आनंद त्यात माझा.’
‘हे काय आणले आहेस?’
‘आणली आहे तुला व मुलांना जम्मत.’
‘काय आहे दाखव ना बुधा.’
बुधाने गाठोडे सोडले. काय होते त्यात? कोणती होती गंमत? त्यात एक सुंदर लुगडे होते. मुलांचे सुंदर सुंदर कपडे होते. मधुरी पहात राहिली.’
‘मधुरी, लुगडयाचा रंग पहा कसा छान आहे.’
‘होय, छान आहे. मंगाला हा रंग फार आवडे. एकदा कर्ज काढून असेच लुगडे त्याने आणले होते. नुकतेच त्या वेळेस आमचे लग्न लागलेले होते. मी त्याचेवर रागावले. तेव्हा तो म्हणाला, मधुरी तुला माझ्या प्राणांनी नटवावे असे वाटते. परंतु प्राण कसे काढू म्हणून या लुगडयाने सजवतो. तुला हे छान दिसेल. माझ्यासाठी नेस. माझ्या डोळयांना आनंद दे बुधा, माझा मंगा वेडा होता.’
‘तू नेसशील ना हे?’
‘आता मंगा थोडाच आहे? आता खेळ संपला, सारे संपले! आता कोणाला दाखवावयाचे हे लुगडे? त्या लुगडयात मला पाहून कोण आनंदेल? कोण टाळया वाजवील? बुधा, लोक हसतील हो आता. म्हणतील, ही मधुरी दुष्ट आहे. नवरा मेला तरीही छचोरपणा करीत आहे. तुझ्या मधुरीला कोणी नावे ठेवावी असे तुला वाटते का? सांग बरे.’
‘कोणी नाही नावे ठेवणार. आणि मला नाही का लोक नावे ठेवणार? मंगाचा मी लहानपणाचा मित्र. मी नाही तुझ्यासाठी काही केले तर मला नाही का लोक बोलणार? मधुरी, तू हे लुगडे नेसलीस तर मला नाही का आनंद होणार? मंगापेक्षा कदाचित थोडा कमी होईल, परंतु होईल. मधुरी, काही प्रिय माणसे सोडून गेली, तर जी उरली असतील त्यांना सुखविण हेही कर्तव्य नाही का? अपूर्णतेत पूर्णता शोधावी. नेस हो तू हे लुगडे. बुधाचे डोळे आहेत ते पाहतील. बुधाचे डोळे नाचतील. मी का अजिबात तुझ्या जीवनात नाही हे काय? असे का करतेस तोंड?’
‘बुधा, काय सांगू तुला?’
‘सांग सारे सांग.’
‘माझ्या मनातले थैमान कोणाला सांगू? माझ्या मनातील लढाई कोणाला माहीत! मी आजपर्यंत दुहेरी जीवन काढीत होते हो बुधा.’
‘म्हणजे काय!’
‘मला नाही माहीत. जाऊ दे. मनात फार डोकावू नये.’
‘मधुरी मी परका आहे?’
‘मला नाही काही सांगता येत.’