‘बाबा म्हणतील विष खा. म्हणून का विष खाऊ?’ मंगाशिवाय दुस-याजवळ लग्न करणे म्हणजे माझे मरण आहे. आई, मी घर सोडून जाईन. पण मंगाजवळ लग्न करीन. मधुरी म्हणाली.
‘तुला तो आवडतो. परंतु त्याला तू आवडतेस का?’ मंगाचे वडील तुला सून म्हणून करुन घ्यायला तयार आहेत का? तुझ्या वडिलांना मंगा पसंत नाही. त्याच्या वडिलांशी भांडण झाले म्हणून! त्याचप्रमाणे मंगाचा पसंत नाही. त्याच्या वडिलांशी भांडण झाले म्हणून! त्याचप्रमाणे मंगाचा बापही म्हणेल की माझ्याशी भांडणा-याची मुलगी माझ्या मुलाला नको. मग तू काय करशील?
‘आई, मंगाही मग स्वत:चे घर सोडील. आम्ही दोघे कोठेही राहू. मी मंगाशिवाय जगू शकत नाही. तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही. आई, तुझा आशीर्वाद दे. आम्ही सुखाने संसार करु.’
‘दिवस चालले होते. ताटकळलेले दिवस. शेवटी महिन्याच्या शेवटचा दिवस आला.
‘मधुरी, काय ठरला तुझा विचार?’ पित्याने विचारले.
‘घर सोडण्याचा.’ ती म्हणाली.
‘ठीक, तुझा रस्ता मोकळा आहे. जा.’
‘येते बाबा.’
मधुरी आईबापांच्या पाया पडून घरातून बाहेर पडली. आईबाप दारात उभे राहून बघत होते. मधुरीने मागे वळून पाहिले नाही. बाप घरात जाऊन खाटेवर पडला.