‘मी माझी झोपडी सोडणार नाही. येथे मी स्वतंत्र आहे. उद्या तुमच्या घरी आल्ये समज आणि झाले भांडणबिंडण तर काय करा? भांडयाशी भांडे आले म्हणजे वाजतेच. एखादे वेळेस मुलांना रागे भरले तर म्हणाल, आमची आहेत मुले. परंतु माझ्या घरी मूल असेल तर माझे म्हणून होईल. माझाच लळा लागेल. खरे ना?’
‘खरे आहे. परंतु मी नाही मूल देणार.’
‘बरे राहिले.
‘मंगा घरी आला. त्याने मधुरीला सारी हकीकत सांगितली. मधुरीला राग आला. परंतु किती झाले तरी स्त्रीहृदयाच्या भुका ती’ जाणत होती. तिला त्या म्हातारीची कीव आली. परंतु सोन्याला ती थोडीच देणार होती? ती दोघे म्हातारीच्या घरी परत गेली नाहीत. त्यांना संकोच वाटे. जिने आपणावर खूप लोभ केला तिची इच्छा पुरी करता येत नाही म्हणून त्यांना वाईट वाटे आणि तिकडे म्हातारीसही वाईट वाटले. मंगा व मधुरी कित्येक महिन्यांत आली नाहीत म्हणून तिला कसे तरी होई. शेवटी एके दिवशी ती म्हातारी स्वत:च मधुरीकडे आली. मधुरी मनीला झोपवीत होती. सोन्या व रुपल्या अंगणात खेळत होते.
‘काय ग मधुरी, काय करते आहेस?’ आजीने घरात शिरुन विचारले.
‘कोण, आजी? ये. मी या मनीला निजवीत आहे.’ मधुरी उठून म्हणाली.
‘निजव, निजव.’ ती म्हणाली.
‘मनी झोपली. मधुरी व म्हातारी दोघी तेथे बसल्या होत्या.
‘काय ग आजी, आज इकडे कोठे आलीस?’
‘मधु-ये, माझी झोपडी सोडून मी कधी कोठे गेल्ये नव्हते. आज किती वर्षांनी मी गावात आल्ये आहे.’
‘आजी आम्ही तुझ्याकडे आलो नाही म्हणून रागावलीस होय?’
‘मी माझ्यावर रागावल्ये आहे. दुस-यांच्या मुलांची भीक मागणारी ती राक्षशीणच असली पाहिजे. मधुरी, मला क्षमा कर.’
‘हे काय आजी? तू सोन्या मागितलास त्यात वाईट काय झाले? मी तुझी मन:स्थिती ओळखते. तुझी भूक जाणते. तरीही सोन्या द्यावा असे मला वाटेन. आजी, आम्हीही लोभीच.’
‘मधुरी, परंतु तुम्ही माझ्याकडे येण्याचेही बंद केलेत.’
‘तुझी इच्छा पुरी करण्याचे धैर्य नाही. म्हणून तू दुष्ट आहेस असे नाही हो आमच्या कधी मनात आलं. आजी, तू आमची आई झालीस. तुझ्या आशीर्वादानेच आम्ही जगत आहो. कोण आहे आम्हांला? घरची, दारची सारी पारखी झालेली. खरे ना? तुझे प्रेम, तुझे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही.’
इतक्यात सोन्या व रुपल्या आत आले.