‘मधुरीचे व मुलांचेही बरे झाले. हाल वाचले. नाही तर त्यांना कोणी विचारिले असते? तीन मुलांची आई मधुरी. तरीही बुधाने तिला प्रेमाने स्वीकारिले. धन्य त्याची!’
‘त्याने प्रेमाने स्वीकारले का करुणेने?’
‘करुणाच असेल - तारुण्यातील प्रेम अद्याप थोडेच असेल?’
‘असेल हो.’
असे लोक बोलू लागले. बुधाने गावाला मेजवानी दिली. सारे लोक आनंदले.
‘बारा वर्षे घर सुने होते. आता गोकुळ होवो!’
‘आता आनंदाने गजबजो.’
‘आता संगीत सुरू होऊ दे.’
‘आता भरपूर सुख पिकू दे.’
असे आशीर्वाद देऊन लोक गेले. कोणी मंगाबद्दलही हळहळले. मधुरीलाही मधुन रडू येई. समारंभ संपला. नवीन घराची मधुरी मालकीण झाली. घराला कळा आली. घर झाडले गेले. नवीन रंग दिला गेला. जणू आज दिवाळीच होती. किती वर्षांत त्या घराला रंग दिलेला नव्हता. कोणाचे नशीब कधी उघडेल याचा नेमच नसतो.
दिवाणखान्यातील हंडया, झुंबरे, तसबिरी पुसण्यात आल्या. तेथे छानदार बैठक घालण्यात आली. गालिचे पसरले गेले. तक्के, लोड ठेवण्यात आले. मखमलीची कोचे ठेवण्यात आली. फुलांचे गुच्छ ठेवण्यात आले. सर्वत्र स्वच्छता, सौंदर्य व प्रसन्नता दिसून येत होती.
मधुरी रेशमी पातळ नेसली. तिने मोत्याचे अलंकार घातले. ती एकदम निराळी दिसू लागली. ती अगदी नवीन तरुण युवती जणू झाली.
‘मधुरी, तू किती सुंदर दिसतेस!’ बुधा बोलला.
‘तुझ्यामुळे हो. तुझ्यासाठी मी पूर्वीची झाले. तुझ्यासाठी जणू नवीन झाल्ये. बारा वर्षांपूर्वी होते तशी झाल्ये. मला आज हलके हलके वाटते आहे. पाखरासारखे उडावे असे वाटते आह. बुधा, काय जादू केलीस?’
‘तुझ्याच हृदयातील बंद भाग उघडल्यामुळे ही जादू झाली. तुझ्या हृदयाचा एक कप्पा आजपर्यंत बंद होता. तो आज उघडला. त्यातील न खर्चिलेली संपत्ती बाहेर पडत आहे. खरे ना?’
‘बुधा, मंगा म्हणायचा तुला मोत्यांनी नटवीन.’
‘मंगाची इच्छा पूर्ण झाली. तुला दारिद्रयात खितपत पडावे लागू नये अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी तो समुद्रापलीकडे गेला. ठीक, तू आता गरिबीत गारठणार नाहीस. आपणास मंगाचा आत्मा आशीर्वाद देत असेल. तो आपल्याभोवती असेल व प्रेमळ दृष्टीने पहात असेल नाही?’