‘कोठे निजू.’
‘अंथरूण घालून देतो.’
‘तुझ्या मांडीवर निजू दे.’
‘मग मी वल्हे कसे मारू?’
‘थोडा वेळ वल्हे थांबू दे. समुद्र बुडवणार नाही. घे मला जवळ घे घे घे. क्षणभरी तरी माझे डोके तू आपल्या मांडीवर ठेव. मी का इतकी पापी आहे? किती रे दुष्ट? तुला मी तुरुंगात ठेवले आणि घरी मी रडत होते. जणू माझा प्राणच मी तुरुंगात ठेवला होता. मी तुझ्यापासून जणू निराळी नव्हते. मंगा, मला दुष्ट नको मानू, राक्षशीण नको मानू.’
लाटांचे तुषार उडत होते. नाव नाचत होती. आणि राजकन्येने आपले मस्तक मंगाच्या मांडीवर ठेविले होते. आणि त्याने तिचे केस सारखे केले. तिच्या कपाळावर त्याने आपला हात ठेवला. सभोवती सागराची प्रचंउ हालचाल चालली होती. त्या दोन शांत जीवांच्या हृदयांतही भावनाकल्लोळ उचंबळला होता.
‘राजकन्ये, तुला अंथरूण घालून देतो. तू नीट नीज.’
‘द्या घालून.’
मंगाने शय्या तयार केली आण राजकन्या निजली. खरोखर तिला झोप लागली. मंगा जागा होता. तो नाव नेत होता. काही वेळाने ती उठली.
‘आता तुम्ही निजा. तुम्ही थकले आहात.’
‘तू थकलीस की मला उठव.’
‘उठवीन.’
मंगा झोपला. राजकन्या नाव चालवत होती. रात्र झाली होती. आता अंधार होता. अनंत सागर पसरलेला. अनंत अंधार पसरलेला. मधूनमधून समुद्रातून जाळ उठलेला दिसे. लाटातून ज्वाला पेटलेल्या दिसत. समुद्राचा फेस चमके. राजकन्येच्या डोळयांसमोर निराशा होती. ती काही तरी विचार करीत होती. तिच्या अंगावर दागिने होते. सोन्या-मोत्यांचे दागिने. जणू ती विवाहासाठी नटलेली होती. ती मंगाकडे पाही, पुन्हा डोळे मिटी असे चालले होते. शेवटी तिने आपले सारे दागिने तेथे त्याच्या पायाशी काढून ठेविले. मंगाला तिने प्रेममय प्रणाम केला. पोट भरून त्याला शेवटचे पाहिले. नंतर तिने नावेतून समुद्रात हळूच बुडी घेतली. तिने आपले जीवन सागराला अर्पण केले. सागराला की प्रेमसागराला?’
काही वेळाने मंगा जागा झाला, तो राजकन्या नाही. कोठे गेली राजकन्या? ते दागिने त्याच्या पायाशी होते, तिने समुद्रात उडी टाकली हे त्याच्या लक्षात आले. तो खिन्न झाला. काय करावे ते त्याला सुचेना. तो शून्य मनाने बसला. नाव लाटांवर खेळत होती. आपण तरी सुरक्षित जाऊ का? कोठे आहे आपला देश? ही लहानशी नाव टिकेल का? वादळ उठले तर ती बुडेल. लहान नाव कशी टिकणार?