दुसरे दिवशी व्यापारी मंगाच्या घरी गेला. मंगाचे वडील घरी होते. मंगा कामाला गेला होता. नमस्कार-चमत्कार झाले. बोलणे निघाले.

काय असेल ते असो, तुमच्या मुलाने माझे मन मोहून घेतले आहे. मी आजपर्यंत किती तरी तरुण पाहिले. परंतु त्याने मला वेड लावले. माझ्या मुलीला हाच वर असावा, असे मला वाटते. तुम्ही नाही म्हणू नका. माझी एकुलती एक मुलगी. मी तुमच्या मुलाला घरजावई करीन. माझ्या घरी कशाला तोटा नाही. तुमची संमती द्या मुलाला सांगा.

‘माझे तो ऐकेल?’
‘तुमचे प्रेम असेल तर ऐकेल.’

‘आईबापांचे का मुलांवर प्रेम नसते? परंतु मुले आईबापांचे सारेच ऐकतात असे नाही. परंतु तुम्ही अकस्मात आलेत. योगायोग दिसतो. माझ्या मुलाने श्रीमंत व्हावे असे मला नेहमीच वाटते. कदाचित माझी ईच्छा खरी व्हायची असेल. नाही तर असे विचार ‘माझ्या मनात सदैव यावे तरी का?’

‘खरे आहे. येणा-या गोष्टींचा आधी गंध येतो. होणा-या गोष्टींची छाया पडते. तुम्ही विचारा हं. मी जातो. उद्या परत येईन.
तो व्यापारी निघून गेला होता. पिता अत्यंत आनंदला होता. परंतु मंगा ऐकणार नाही, हीच काय ती त्याला भीती होती. आपण धाक घालू, धमकी देऊ वगैरे गोष्टी तो मनात योजीत होता. शेवटी त्या दिवशी त्याने मंगाजवळ रात्री बोलणे काढले.

‘मंगा, तुझे नशीब थोर आहे.’
कशावरुन?’
‘तू एकदम श्रीमंत होणार.’
‘कोणी सांगितले?

‘एक श्रीमंताची मुलगी तुला मिळणार.’
‘काय?’

‘मंगा, तुझे लग्न करण्याचे विचार माझ्या मनात खेळत होतेच. परंतु इतक्या लौकर अकस्मात काही नेमानेमाच्या गोष्टी घडून येतील असे नव्हते वाटले. आपल्या गावात एक व्यापारी आला आहे. तो आपल्य मुलीला वर शोधीत आहे. त्याची एकुलती एक मुलगी. दुसरे मूलबाळ नाही. तो जावयाला घरजावई करणार आहे. तो व्यापारी आज आपल्याकडे आला व तू त्याच्या मुलीचा नवरा व्हावे अशी स्वत:ची इच्छा त्याने प्रकट केली. तुला त्याने कसे, कोठे पाहिले देव जाणे. मी आश्चर्यचकित झालो. परंतु या सर्व गोष्टींत देवाचा वा दैवाचा हात आहे असे मला वाटते. मंगा, दैव चालून आले आहे. भाग्य आपण होऊन भेटायला आले आहे. तू नाही म्हणू नकोस. आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नये. चांगले होईल. माझा मंगा सुखी, श्रीमंत होईल. खरे ना? हो. श्रीमंत हो. मग बंदरावर माल उपसावा लागणार नाही. कपडे मळणार नाहीत. पाठ ओझ्याखाली वाकणार नाही. माझा मंगा सुखाने राहो. राजासारखा राहो. तू मोठा होण्यासाठी जन्मला आहेस असे मला नेमही वाटे. मंगा, तू असा का दिसतोस? भाग्याच्या गोष्टी ऐकून तू हसण्याऐवजी रडवेला का झालास?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel