‘होय. पहा नीट म्हणजे ओळख पटेल. आजी, मीच हो अभागी मंगा. माझे गलबत फुटले. बुडले. मी पोहोत होता. दमलो. एका किना-यावर जाऊन पडलो. तेथून मी गेलो. एका राज्यात गेलो. तेथील राजाच्या मुलीचे माझ्यावर प्रेम जडले. मी तिचा व्हावा म्हणून तिने पराकाष्ठा केली. तिने माझी पूजा केली, माझे हाले केले आणि शेवटी ती व मी एका होडीत बसून निघालो. आजी, मला झोप लागली असता तिने अनंत पाण्यात स्वत:च्या जीवनाचा बुडबुडा मिळवून टाकला. मी थक्क झालो. कसे हे असे वेडे प्रेम? आणि मीही तसाच वेडा. ती राजकन्या माझ्यासाठी वेडी, मी मधुरीसाठी वेडा; आणि मधुरी?’
तो थांबला. कोणी बोलले नाही.
म्हातारी एकदम त्याच्याजवळ येऊन बसली. ती त्याच्या केसांवरून हात फिरवू लागली.
‘मंगा, तुला ओळखले नाही मी.’ ती म्हणाली.
‘माझा रंग बदलला, रूप बदलले आहे. आवाज बदलला आहे.’
‘परंतु मन नाही बदलले. हृदय नाही बदलले.’
‘आजी, मी काय करू? मी मरू?’
‘मंगा, बरा होशीली तू.’
‘बरा होऊन कोठे जाऊ, कोठे राहू, कोणाला पाहू? मला कोण आहे?’
‘तू माझ्याजवळ राहा.’
‘मधुरीला काय वाटेल? ती वेडी होईल. तिला सुखात राहू दे. मंगाच्या गोड आठवणीत राहू दे. जिवंत मंगाचे दर्शन तिला मारील. बुधा व मधुरी. त्यांचा आनंद मी का धुळीत मिळवू? नको, आता जीवन नको आजी, मी गेल्यावरही मधुरीला सांगू नको. माझी गोधडी तिच्याजवळ आहेच.’
‘मंगा, शांत राहा.’
‘आजी, आता कायमची शांती मिळेल हो. समुद्र शांत होईल.’