‘आई, नको, भाजले ग आई. सोन्याने हंबरडा फोडला. बरे झाले. पुन्हा हात कोणापुढे होणार नाही.’
‘आई ग, आग होते ग, आई, आई!’
इतक्यात मंगा आत आला.
‘काय आहे रे ? काय झाले?’
‘आईने हात भाजला माझा. कोलीत ठेवलेन हातावर. आई ग.’
‘तू काय केलेस?’
‘काटर्याला सतरांदा सांगितले होते कोणाकडे जाऊ नये म्हणून.’ परंतु आज सणावारी दुस-याच्याकडे गेला व सांजोरी मागितली. दळभद्रा आहे मेला. चांगली आठवण राह्यला हवी म्हणून दिला डाग. पुन्हा हात पसरणार नाही मला.’
मंगा काही बोलला नाही. त्याने सोन्याला जवळ घेतले. त्याने त्याला उगी केले. त्याचा हात त्याने कुरवाळला, हाताला चांगलाच फोड आला होता. सोन्याला घेऊन तो बाहेर बसला. रुपल्याही रडत होता. त्यालाही त्याने जवळ घेतले. दोन्ही मुलांच्या अंगावरून तो हात फिरवीत होता. सोन्याच्या तळहातावर पुन: पुन्हा फुंकर टाकीत होता. मंगाच्या डोळयांतील पाणी त्या तळहातावर गळू लागले. तो गहिवरला.
‘बाबा, तुम्ही का रडता? तुम्ही नका रडू. असे म्हणून सोन्याने बापाच्या गळयाला एकदम मिठी मारिली. तिकडून मधुरी आली. हाताला गार वाटावे म्हणून लावायला तिने काही तरी आणले होते.
‘नको लावू काही जा.’ सोन्या म्हणाला.
‘लावू दे. बाळ. बर वाटेल. कर हात पुढे. हळूच लाव हो मधुरी.’ मंगा म्हणाला. आईने औषध लाविले. तीही रडत होती. सोन्याने आईच्या डोळयांतील पाणी पाहिले.
‘आई, मला घे ना जवळ, घे.’ असे म्हणत तो एकदम येऊन आईला बिलगला. मधुरीने त्याला जवळ घेतले. त्याने आपले तोंड तिच्या पदरात खुपसले. पतिपत्नी तेथे खिन्न होऊन बसली. मंगा उठला व पुन्हा बाहेर जाण्यासाठी निघाला.
‘मंगा, कोठे जातोस?’
‘मसणात.’
‘सणावारी नको हो मंगा असे बोलू.’
‘सणावाणी सोन्यासारख्या मुलांस डागावे वाटते?’
‘नको अशा शब्दांनी मला भाजू मंगा. जाऊ नकोस या वेळेस कोठे.’
‘जाऊ दे मला.’
मधुरी बोलली नाही. मंगा गेला. मधुरीने मुलांना काही तरी गोड करून दिले.