‘बुधाकडून पैसे आणशील?’
‘नाही आणणार. तेवढे नको सांगू.’
‘मधुरी, बुधाकडे तू कधीच जाणार नाहीस? उद्या मी गेलो व घरी वाण पडली, मुले आजारी पडली तरीही तू नाही जाणार? इतकी तू कठोर आहेस?’
‘काय सांगू मंगा? परंतु मला आज जावेसे वाटत नाही. उद्या
काय होईल कोणी सांगावे? मधुरी तुझ्यासारखी निश्चयी थोडीच आहे? मधुरी चंचल आहे मंगा.’
‘मग मला भांडवल तर हवे.’
‘ही जागा विकून टाक. हे दागिने वीक.’
‘तुम्ही कोठे राहाल?’
‘राहू एखाद्या रुपया आठ आण्याच्या खोलीत. होईल कसे तरी.
‘मधुरी मनापासून हे?’
‘होय, मनापासून. एकदा ठरले ना तुझे जायचे? मग आता मनापासून न करुन काय करु? तुझे समाधान ते माझे. आम्हां स्त्रियांना दुसरे समाधान कोठे आहे मंगा! आम्ही पुरुषांच्या सुखासाठी, त्यांच्या इच्छांसाठी, त्यांच्या महत्त्वाकांक्षांसाठी. आम्हांला निराळे स्थान आहे कोठे! खरे ना? जातोस तर आनंदाने जा. मला समाधानाने निरोप दे.’
‘मधुरी, नीज.’
‘आता कोठली नीज?’
‘हे काय, समाधानाने ना राहणार?’
‘होय.’
‘मग नीज. जो समाधानी असतो त्याला नीट झोप लागते. नीज मधुरी.’
सकाळ झाली. मधुरीला आज गाढ झोप लागली होती. मुले उठली. मनी आईजवळ निजलेली होती. मंगा उठला होता. त्याने मधुरीला उठविले नाही. तो मधुरीकडे पाहत होता. मधुरी हसली. किती गोड हसणे! मंगा एकदम पुढे झाला व मधुरीचे तोंड त्याने कुरवाळले. ती जागी झाली.
‘झालीस का जागी?’
‘मंगा गोड स्वप्न पहात होते. तू मोडलेस माझे स्वप्न.’