आशीर्वाद
आणि मंगा खंगत चालला. त्याला अंत जवळ आला असे वाटू लागले.
‘आजी, माझी ती पेटी उघड. तीत जे काय आहे ते बाहेर काढ.’ तो म्हणाला. म्हातारीने पेटी उघडली. तीत सोन्यामोत्याचे दागिने होते.
‘आजी, हे त्या राजकन्येचे दागिने. माझ्या पायाशी ठेवून ती गेली. मधुरीला नटविण्यासाठी का तिने ठेवले? अशी का तीची इच्छा होती? होय. तीच असेल. हे दागिने मधुरीला दे. मी तिला म्हणत असे, की तुला सोन्यामोत्यांनी नटवीन.’
‘ठेवू का ट्रंकेत पुन्हा?’
‘दे ठेवून.’
एके दिवशी रात्री मंगा बोलत होता. त्या राजकन्येच्या गोष्टी सांगत होता आणि एकदम थांबला. थोडया वेळाने आजीला म्हणाला,
‘आजी, या जगात सत्य आज ना उद्या बाहेर पडते. नाही का?’
‘होय. मंगा, सत्याला शेवटी वाटा फुटते.’
‘मी येथे कोणाला न कळवता जरी मेलो तरी पुढे कोणी सांगितले की मंगा येथे येऊन मेला. मधुरीला ते ऐकून काय वाटेल? म्हातारीच्या झोपडीतील तो मुशाफर मंगा होता, तो गोधडीवाला मंगा होता, हे जर कधीकाळी मधुरीला कळले, तर तिला काय वाटेल? त्यापेक्षा मी आपण होऊन तिला ओळख दिली तर? माझ्या मनात मत्सर नाही. मी शिव्याशाप नाही देत, तर उलट आशीर्वाद देतो. असे तिला सांगेन. तिला समाधान वाटेल नाही आजी?’
‘होय.’
‘मग तू आणतेस मधुरीला बोलावून?’
‘आता रात्री?’
‘फार का रात्र झाली आहे?’
‘असे वाटते.’
‘बरे, उद्या उजाडत तिला आण बोलावून. तू आता नीज आजी.’
आजी झोपली. मंगा स्वस्थ पडला होता. मध्येच आजी उठे व बघे. मंगा शांत होता. लेकराप्रमाणे जणू पडला होता.
सकाळ झाली.
‘आजी, तू जाणार आहेस ना मधुरीकडे?’
‘होय हो, मंगा.’
आजीने झाडलोट केली. ती आता निघणार तो मधुरीच दारात हजर. सुंदर फुले घेऊन ती आली होती.