‘पुरे आता बुधा.’
‘पाणी दे चल.’
तिने त्याला भरपूर पाणी दिले. बुधाचे मंगलस्नान झाले.
‘असे स्नान बारा वर्षांत केले नाही. मंगलस्नान.’
‘जणू रासन्हाणे.’
‘रासन्हाण्यात दोघे एकदम न्हायला बसतात.’
‘आणि एकमेकांच्या अंगावर चुळा फेकतात.’
‘तू त्या गोष्टी थोडयाच अनुभवल्यास? मंगा व तू लग्नसोहळा थोडाच केलात?’
‘बुधा?’
‘काय?’
‘आता फराळ करतोस का? रांगोळया काढ. मुलांना बोलाव.’
बुधाने सुंदर रांगोळया घातल्या. पाने मांडली. मुले आली. फराळाला बसली सारी.
‘तुम्हीसुध्दा आमच्याकडे फराळाला?’ रुपल्याने विचारले.
‘हो!’ बुधा म्हणाला.
‘तुमच्या घरी कोणी नाही?
‘कोणी नाही.’
‘केवढे आहे तुमचे घर?’ सोन्या म्हणाला.
‘त्या घरात तुम्ही एकटे राहता?’
‘हो.’
‘तुम्हाला भीती नाही वाटत?’ सोन्याने विचारले.
‘वाटते. परंतु दुसरे कोण येणार?’
‘आम्ही येऊ तुमच्याकडे राहायला? मोठया घरात राहायला?’ रुपल्याने विचारले.
‘तुम्हाला आवडेल का माझे घर?’
‘ही झोपडीसुध्दा आम्हाला आवडते. मग का तुमचा बंगला आवडणार नाही? आणि तुमची बाग आहे. होय ना हो?’