‘मीच तिला विचारुन येतो.’
मधुरीचा बाप आत गेला. मधुरी आतून सारे ऐकत होती. पित्याची चाहूल लागताच तिने पटकन् तोंडावरुन घेतले. तिच्या तोंडावरचे रंग का बदलत होते? ते रंग का ती लपवू पहात होती?’
‘मधुरी, अगं मधुरी.’ पित्याने हाक मारली.
‘काय बाबा?’ पांघरुन तोंडावरुन काढून तिने विचारले.
‘जरा बसतेस का? तुझ्याजवळ बोलायचं आहे थोडं.’
‘हो बसते बाबा. सांगा काय ते.’ ती उठून बसून म्हणाली.
‘तू आता मोठी झालीस. तुझ्या लग्नाच्या गोष्टी निघाल्या आहेत. श्रीमंत नवरा तुला आवडेल का?
‘नको. श्रीमंतीचे नाव नको.’
‘मधुरी, बुधा तुझा एक बाळमित्र होता?’
‘हो.’
‘तो श्रीमंत होता.’
‘परंतु तो आमच्याबरोबर खेळे. वाळूतले किल्ले माझ्यासाठी बांधी. मी त्याला पाण्यात नेत असे. बुधा स्वभावाने गरीब होता. श्रीमंत असून गरीब होता.’
‘तुला तो आवडतो?’
‘हो.’
‘तो तुला नवरा आवडेल?’
‘नाही.’
‘म्हणजे?’
‘नव-याशिवाय तो आवडेल.’
‘त्याच्या बापाने तुला मागणी घातली आहे. मी काय सांगू?’
‘नको असे सांगा. मधुरीला बुधा आवडतो, परंतु नवरा म्हणून नाही आवडणार असे सांगा. जा ना आजा बाबा. मला पडू दे. माझे डोके दुखत आहे.’