‘सोन्या, काम करायला हवे बाळ. उद्या मी बाळंत झाल्यावर दुसरे कोण आहे घरात?’
‘आई, दुस-या कोणाकडे पाठव ना कामाला?’
‘दुसरे कोण आहे बाळ?’
‘आई, ते एक गृहस्थ मला विचारीत होते की, तू येशील का माझ्याकडे कामाला? त्या उंच माडीत ते राहतात. काय बरे त्यांचे नाव?’
‘बुधा त्यांचे नाव.’
‘जाऊ त्यांच्याकडे कामाला!’
‘नको बाळ. सध्या तरी नको.’
‘तुझ्या ओळखीचे आहेत ते?’
‘हो.’
‘ते चांगले नाहीत?’
‘चांगले आहेत हो.’
‘मग का नको जाऊ!’
‘त्यांच्याकडे शिकायला जात जा; म्हणावे मला शिकवा.’
‘ते शिकवतील?’
‘हो.’
दुस-या दिवसापासून सोन्या थोडा वेळ बुधाकडे जाऊ लागला. बुधाला आनंद झाला. तो त्याला आपल्याजवळ बसवी. दूध प्यायला देई. त्याला लिहायला शिकवी. चित्रे काढायला शिकवी. गप्पा मारी.
‘तुम्ही मला एकटयाला खाऊ देता.’ सोन्या म्हणाला.
‘आणखी कोणाला देऊ?’
‘घरी रुपल्या आहे. मनी आहे.’
‘आणखी कोण आहे?’
‘आई आहे.’
‘आईलाही खाऊ हवा का?’
‘खाऊ लहान मुले खातात.’