मी विचार करीन
‘सोन्या, तू व रुपल्या शाळेत जा.’ एके दिवशी बुधा म्हणाला.
‘पण पाटी-पुस्तके?’ सोन्याने विचारिले.
‘मी आणून देईन.’
‘रोज आई खाऊ देईल तर मी शाळेत जाईन.’ रुपल्या म्हणाला.
‘मास्तर देतील ना खाऊ.’ बुधा हसून म्हणाला.
‘म्हणजे मार ना? तसला खाऊ नको मला. गोड खाऊ हवा.’
‘बरे हो. तुमच्याजवळ आणून ठेवीन. जात जा दोघे शाळेत चांगलं शिका.’
‘आणि मनी!’
‘मनी हवी आईला मदत करायला.’
‘पाणी सांडायला. चिखल करायला.’ सोन्या म्हणाला.
मधुरीने चिबूड फोडून आणला.
‘घे बुधा.’ ती म्हणाली.
‘आई, आम्हांला?’ मुले म्हणाली.
‘तुम्ही खाल्ला नाही का? असे काय आधाशासारखे करता? गोड आहे का साखर लावतोस?’
‘गोड आहे.’
‘तुला सारे गोडच वाटते.’
‘तुझ्या हातचे सारे गोड. परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते. तुझा हात लागला की असेच होत असेल. माझे जीवन मातीमोल झाले होते. परंतु तू ते आज सोन्याचे केले आहेस. हसतेस काय मधुरी? हस. गोड हस. तुझ्या हसण्याचे किरण पडू देत माझ्या जीवनावर. माझे जीवन चमकेल. फुलेल.’
बुधा चिबूड खाऊन निघून गेला.
सायंकाळी बुधा आला.
‘मधुरी, आज फिरायला येतेस? किती तरी वर्षांत आपण बरोबर समुद्रावर गेलो नाही. येतेस?’
‘चल बुधा.’
आणि सारी समुद्रावर गेली. मधुरी ते नवीन अस्मानी पातळ नेसली होती. किती प्रसन्न दिसत होती ती. मुले वाळूत खेळू लागली. पाण्यात डुंबू लागली. बुधा व मधुरी टेकडीवर बसली. कोणी बोलेना. समुद्राकडे बघत होती दोघे.