‘आजी, मला आपले वाटते की मंगा येईल.’
‘आता नाही येण्याची आशा. मधुरी, बुधाजवळ लग्न केलेस तरी हरकत नाही. तुम्ही मंगाला फसवता असे नाही. मगा मेला असे कळल्यावर बधा अशा गोष्टी तुजजवळ बोलू लागला, तोपर्यंत त्याची कथा, त्याची निराशा त्याने स्वत:जवळ ठेवली होती. मधुरी, बुधाने अपार कष्ट भोगले. सुखात भिका-यासारखा राहिला. दे त्याला थोडे सुख दे. त्याच्या जीवनात फुलव फुले. त्यात पाप नाही. देव दोष देणार नाही. मीच तुला हे सांगणार होते.’
‘आजी, आम्हांला तुझा आशीर्वाद आहे?’ मधुरीने विचारले.
‘होय आहे. म्हातारी म्हणाली.
‘तर मग तूच आमचे हात एकमेकांच्या हातात दे.’ बुधा म्हणाला.
आणि म्हातारीने त्यांचे लग्न लावले. दोघांचे हात हाती देण्यात आले. दोघे आजीबाईंच्या पाया पडली. आजीबाईने गुळाचा खडा दोघांना दिला. गोड तोंड करून दोघे गेली. बुधा पळत सुटला. मधुरी मागून येत होती. बुधाने जाऊन मनीला उचलले. तो नाचू बागडू लागला. एकदम त्याला जणू नवे पंख फुटले. एकदम अपार उत्साह व आनंद त्याच्यात संचारला. समुद्र नाचत होता. उचंबळत होता. बुधाही उचंबळत होता. ती सारी घरी आली. एकत्र बसली.
‘सोन्या, आता तुम्ही सारी माझ्याकडे राहायला येणार. ठरले.’
‘होय का ग आई?’ त्याने विचारले.
‘होय. आपण बुधाकाकांकडे राहायला जायचे. ते आता तुमचे बाबा होतील. ते तुम्हांला शिकवतील, खेळवतील, खाऊ देतील. माझ्या मंगाची जागा बुधा भरून काढील.’ ती म्हणाली.
‘म्हणजे आमचे बाबा होते तसे बुधाकाका, होय ना?’ त्याने विचारले.
‘होय.’ मधुरी म्हणाली.
‘आता मोठया घरात जायचे रुपल्या.’ सोन्या म्हणाला.
‘मजा येईल. मी बागेत खेळेन.’ रुपल्या म्हणाला.
‘मी बागेतील फुले तोडीन.’ मनी म्हणाली.
आणि दुस-या दिवशी खरेच सारी बुधाच्या घरी राहावयास आली. मधुरीच्या घरी सामान नव्हतेच फारसे. गडीमाणसे कामाला लागली. झोपडीतील संसार बंगल्यात आला. गावात सर्वत्र बातमी पसरली. लोकांना बरे वाटले.
‘बुधा आता हसेल. बरा वर्षे तो हसला नाही.’ कोणी म्हणाले.
‘त्याचे आईबाप त्याच्या दु:खाने मेले. त्यांच्या आत्म्यास समाधान मिळेल.’ दुसरे म्हणाले.