अस्वस्थ मंगा
घरी आता फार ओढाताण असे. मंगाला ती पाहवत नसे. मधुरीला नेसू फाटके लुगडे होते. मुलांच्या अंगावर नीट कपडे नव्हते. दिवाळी जवळ येत होती; नवीन कपडे करायला पाहिजे होते. परंतु जवळ दिडकी नव्हती. मंगा खिन्न दिसे.

‘तू अलीकडे असा का दिसतोस?’ मधुरीने विचारले.
‘असा म्हणजे कसा?’ त्याने विचारिले.
‘सांग ना रे मंगा, काय होते तुला?’
‘मला काहीही होत नाही.’

‘मग चेहरा का असा? मुद्रा का दीनवाणी?’
‘आपण गरीब आहोत म्हणून.’

‘गरिबीची खंत मी कधी तरी मानली का? मला नाही हो कसला सोस. नकोत उंची वस्त्रे, नकोत दागदागिने. आपण गरीब आहोत हेच बरे. त्यामुळे तू माझ्याजवळ आहेस.’

‘गरिबीमुळे तर आपण दूर जातो. दिवसभर तुझ्यापासून दूर राहावे लागते. मुलाबाळांपासून दूर. त्यांच्याजवळ बसता येत नाही. त्यांना खेळवता येत नाही, फिरायला नेता येत नाही. येऊन जाऊन रात्री दोन शब्द तुझ्याजवळ बोलायचे. आता दिवाळी येणार. आपल्या मुलांना ना नीट खायला ना काही अंगाखांद्यावर! मला वाईट वाटते. दिवसभर मी काम करतो, परंतु काय उपयोग?’

‘उगीच असे मनाला लावून घेऊ नकोस. मुले माझी गुणाची आहेत. इवलासासुध्दा हट्ट घेत नाहीत. मंगा, आपण आनंदी राहू. समाधानाने राहू.’

‘तुझ्यासाठी मी मधुरी वरवर हसतो. परंतु मनात वाईट वाटल्याशिवाय राहात नाही. तू बुधाजवळ लग्न लावतीस तर किती सुखात असतीस. कशाला तोटा पडला नसता. पलंगावर पडली असतीस. मच्छरदाणी लाविली असतीस. गाद्यागिर्धांवर लोळतीस. सोन्यामोत्यांनी नटतीस. गडीमाणसे घरी असती. गाडीघोडा असता. चांगले खायला, चांगले प्यायला. भांडी घासावी लागली नसती, हात असे राकट नसते झाले. दुस-याचे दळणकांडण करुन तुझ्या हातांना असे घट्टे पडले नसते. केसांना तेले लावली असतीस. अंगाला उटणे लाविली असतीस. शृंगारसाज केला असतास. मुलाबाळांचे लाड करतीस. त्यांना नटवतीस. त्यांच्या पाळण्यावर खेळणी लावली असतीस. कधी कंटाळतीस तर हवा खायला दुस-या गावी जातीस. परंतु मंगाजवळ लग्न लावलेस. तीच झोपडी. तीच भाकरी. तीच रोज उठूनची ददात. तीच चिंधी नेसायला, तीच भाजी खायला. कंटाळली असशील तू मुलांना घरी ठेवून तुला कामाला जावे लागते. मधुरी, तुला सर्व गोष्टींचे वाईट वाटते. आज आपले लग्न होऊन पाचसहा वर्षे झाली. परंतु इतके वाईट पूर्वी वाटत नसे. अलीकडे मला भडभडून येते. तुझे कष्ट मला पाहवत नाहीत. आपल्या प्रिय माणसास कष्ट पडू नयेत असे आपणास वाटत असते. मला तर तुझे कष्ट करता येत नाहीत. तू पोराबाळांचे करशील. की माझी सेवा करशील? दमून जातेस तू. पूर्वीचा तजेलां तुझ्या चेह-यावर नाही. तू सुकून गेल्यासारखी दिसतेस. मधुरी, मी जाऊ का कोठे? जाऊ कोठे तरी लांब प्रवासाला? वाटते की देशांतर करावे, व्यापार करावा. धनदौलत मिळवावी आणि मधुरीला सुखाच्या स्वर्गांत ठेवावे.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel