‘माझेही डोळे डबडबले. परंतु मुलांना माझे अश्रू दाखविले नाहीत.’
‘मंगा, आपण सारी एकत्र राहू.’
‘तू वेडी आहेस. मी आता वाचणार नाही. तू आता जा. शेवटचा क्षण आला म्हणजे तुला बोलावू?’
‘मी आता येथेच राहीन. जाणार नाही.’
‘मधुरी, माझे ऐक. माझी आज्ञा आहे. तू जा. मी बोलवीन तेव्हा बुधाला व मुलांना घेऊन ये. त्या वेळेस सर्वांना शेवटचे पाहीन.’
‘मंगा!’
‘जा. मधुरी, जा. तू कायमची माझ्याजवळ आहेस. शांतपणे जा, आनंदाने जा.’
‘कसे रे असे तुला बोलवते?’
‘मला मरताना शांती दे. मधुरी. जा, तू आणलेली फुले हातात देऊन जा.’
मधुरीने मंगाच्या हातात फुले दिली. तिने केविलवाण्या डोळयांनी त्याच्याकडे पाहिले.
आणि ती गेली. रडत रडत गेली. टेकडीवर गेली. समुद्रात घुसावे असे तिला वाटले; परंतु तिला मंगाची आज्ञा आठवली. ती मुले आठवली. बुधा आठवला. शत बंधने होती. कोण कशी तोडणार?
शेवटी मधुरी घरी आली. ती गोधडी पांघरून ती पडली.
‘मधुरी, बरे नाही का वाटत?’ बुधाने विचारले.
‘बरे आहे.’
‘मग अशी का?’
‘मला झोप येते.’
‘हल्ली तुला इतकी झोप कशी येते!’
‘देवाला ठाऊक.’
‘तुझ्या मनाला दु:ख आहे? ‘
‘होय.’
‘सांग मला.’
‘वेळ येताच सांगेन बुधा; जा. मला एकटीला पडू दे.’
बुधा म्हातारीकडे गेला.
‘कसे आहे पाहुण्याचे?’
‘चिन्ह नीट नाही. असाध्य आहे दुखणे.’