‘जाते मी.’
‘जरा थांब. पुन्हा कधी येशील तू?’
‘जरुर पडेल तेव्हा.’
‘कामापुरता तेवढा मी.’
‘देवाची संकटातच आठवण होते.’
‘देव होण्यापेक्षा मानव होणे बरे मधुरी.’
‘जाते मी.’
‘एक क्षणभर या गादीवर निजून जा. नीज. निजवू तुला?’
‘नको. ही बघ मीच निजते.’
‘मधुरी त्या गदीवर आडवी झाली. लगेच उठली.’
‘त्या उशीवर तुझे तोंड ठेव मधुरी.’
‘हे बघ ठेवले. झाले ना? जाते आता मी.’
मंगा कुठे आहे?’
‘टेकडीवर.’
‘त्याने तुला एकटीला येऊ दिले?’
‘मंगाचा माझ्यावर विश्वास आहे. तुझ्यावर विश्वास आहे, त्या विश्वासाला आपण पात्र होऊ या. मला पोचव. धर माझा हात.
‘मधुरी, मी कसा जगू?’
‘माझ्या स्मरणाने जग.’
‘तू कठोर आहेस.’
‘काय उपाय? मी तरी काय करु?’
‘मग जातेसच ना?’
‘हो.’
‘मलाही बरोबर ने. समुद्रात नेऊन मला बुडव.’
‘बुधा, काय हे बोलतोस?’
‘मग तुझ्या प्रेमाला मला का बुडवलेस? का मला तुझ्याविषयी प्रेम वाटते?’
‘माझा आनंद तो तुझा आनंद ना?’