‘थांब, मी तुला उचलून ठेवतो.’
‘नको रे बुधा, असे काय वेडयासारखे?’
दोघे नावेत बसली. नावाडी वल्हवू लागले. समुद्राला भरती होती. किती सुंदर देखावा. मधुरी व बुधा हातात हात घेऊन बसली होती.
‘मधुरी, माझ्या मांडीवर डोके ठेवून नीज.’
‘बुधा, वाजव बासरी. तू हल्ली शिकतोस ना?’
‘चांगली नाही येत.’
‘आज येईल. वाजव.’
मधुरी बुधाच्या मांडीवर डोके ठेवून शांतपणे पडली. आणि बुधा बासरी वाजवू लागला. तिचे सूर वा-यावर जाऊ लागले. ते बासरीचे सूर मंगाच्या कानावर जातील का? मंगा ओळखील का ते सूर आणि बासरी ऐकून समुद्र का शांत झाला? वारा का शांत झाला? नाव एखाद्या हंसाप्रमाणे चालली होती. बासरी वाजत होती.
मधुरीच्या डोळयांतून पाणी गळत होते. बुधाने बासरी थांबविली. तो खाली वाकला.
‘मधुरी, हे काय?’
‘काय सांगू बुधा?’
‘का डोळे भरले?’
‘हृदय भरून आले म्हणून.’
‘मधुरी, तुझ्या मनात कोणते विचार खेळत आहेत?’
‘सांगितले तर भिशील.’
‘तू बरोबर असलीस म्हणजे मी कधी भीत नाही.’
‘खरेच?’
‘हो.’
‘सांगू मनातले विचार?’
‘सांग.’
‘मला वाटते की ही नाव अशीच दूर दूर जावी आणि पुढे प्रचंड वादळ उठावे. प्रचंड लाटा उठाव्या. आपण हातात हात घ्यावे व मंगाच्या भेटीला जावे. त्याचेही हात आपल्या हातात मिळतील. जेव्हा तुमचे दोघांचे हात मी माझ्या हाती घेईन तेव्हाच मला पूर्णता वाटेल. मंगाबरोबर मला अपुरे वाटे. तुझ्याबरोबरही अपुरे. माझी भूक फार मोठी. मी मंगाकडेही उपाशी, तुझ्याकडेही उपाशी. पोटभर जेवण कोठेच नाही. अपुरी पडतात तुमची प्रेमे. तुम्ही दिलेले घास अपुरे. आपण तिघे एकत्र राहू या. एकत्र खेळू, खिदळू. लहानपणी ती पूर्णता होती.’