‘बाबा, नको मला ही श्रीमंती. श्रीमंत व्हायचा असेन तर मी स्वत:च्या श्रमाने, पराक्रमाने होईन. ही मिंधी श्रीमंती मला नको. त्या श्रीमंताची मुलगी मला शंभरदा हिणवील, पदोपदी माझ्या गरिबीची मला आठवण देईल. माझ्या डोक्यावर बसेल. ती मला गुलाम करील. ती मला पिंज-यातील पोपट बनवील. तिचे का माझ्यावर प्रेम आहे? ना आम्ही एकमेकांस पाहिले, ना एकमेकांची तोंडओळख. ती उद्या काय म्हणेल? लग्न म्हणजे का आईबापांची आवड? ज्यांची लग्ने लावायची त्यांना नको का विचारायला? त्या व्यापा-याने स्वत:च्या मुलीचा विचार तरी घेतला का? असे कसे हे लोक? हे लोक मुलाबाळांना चांगले खायला प्यायला देतात, कपडेलत्ते देतात, दागदागिने देतात, सारे लाड पुरवितात, परंतु मुलांचा आत्मा मारतात. त्यांच्या वृत्ती, त्यांचे मन नष्ट केले जाते. छे! मला नाही हे पसंत. हा माझाही अपमान आणि त्या मुलीचाही अपमान. उद्या त्या मुलीला मी आवडलो नाही तर? म्हणेल हा कोठून आला धटिंगण? हा कोठून आणला बाबांनी राक्षस? श्रीमंताच्या मुलींना नाजुक सुकुमार नवरे आवडत असतील. माझ्यासारखा थोडाच आवडेल?’

‘तुझ्यासारखेच आवडतात. श्रीमंतांच्या मुलींना, श्रीमंतांच्या बायकांना मोकळेपाणाने बोलता येत नाही. परंतु त्यांची मने कोणी पाहिली मंगा? मुलीचे काय? त्या व्यापा-याला जर तुला पाहून एकदम मोहिनी पडली तर त्याच्या मुलीला का पडणार नाही?  आणि मला तरी या सर्व गोष्टींत काही तरी ईश्वरी संकेत दिसतो. विधिघटना दिसते. माणसाने देवाच्या इच्छेविरुध्द जाऊ नये. अशाने भले होणार नाही.’

‘बाबा, तुम्ही काही म्हणा. परंतु माझे मन रुकार देऊ शकत नाही.’
‘पण का?’
‘काय सांगू तुम्हांला?’
‘सांग सा-या शंका, सा-या अडचणी.’

‘बाबा!’
‘काय बाळ?’
‘मंगाने स्वत:चे लग्न कधीच ठरविले आहे.’
‘कोणाच्या मुलीजवळ?’

‘माझ्या लहानपणच्या मैत्रिणीजवळ.’
‘ती मधुरी?’
‘हो.’

‘ती भिका-याची पोर?’
‘ती श्रीमंत मनाची थोर मुलगी.’
‘मंगा!’
‘काय बाबा?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel