‘मंगा!’
‘तुझे म्हणणे मी ऐकणार नाही. मी ठरविले आहे. तुझ्या अश्रूंनी माझा निश्चय डळमळणार नाही. मी नाही बाईलवेडा. मला पुरुषार्थ करु दे. पराक्रम करु दे. हे असे माशा मारीत बसणे मला नाही पसंत. रोज उठून तेच ते ठरीव जीवन. मंगा यासाठी नाही जन्मलेला. मधुरी, मी काही माल घेऊन जाणार आहे. माझ्याजवळ थोडेस भांडवल आहे व बुधाकडे जाऊन आणखी काही पैसे मागशील?’ माझ्यासाठी माग. मी आलो म्हणजे त्याचे पैसे परत देईन. जाशील?’
‘मी नाही जाणार. मला नाही कोणाजवळ पैसे मागणे आवडत आणि ज्या बुधाकडे एरव्ही कधीही आपण जात नाही, त्याच्याकडे कामापुरते जाणे हे फारच वाईट. तू येथून जाणार नसशील तर शंभरदा बुधाकडे जाईन व पैसे आणीन. परंतु ज्या पैशामुळे तू आम्हांस सोडून ते पैसे मी कसे आणू?’
‘मधुरी, तुला असे का वाटते, मला कोठेच पैसे मिळणार नाहीत?’
‘मला असे नाही वाटत. माझ्या अंगावर दोन दागिने आहेत ते तू घेऊ शकशील. तुझ्या ओळखी असतील. एखाद्या व्यापा-याजवळही तू मागशील.’
‘व्यापा-याजवळ?’
‘मागे नव्हता का व्यापारी आला व सारी इस्टेट देऊ पहात होता?’
‘त्याच्याकडे का मी पुन्हा जाईन? मधुरी, तू मला काय समजतेस?’
‘मी तुला माझा समजते. मंगा, नको रे जाऊ.’
त्या दिवशी बोलणे तसेच राहिले. परंतु मधून मधून बोलणी होत, खटके उडत. घरी आता मंगा बसत नसे. रात्रीही तो बाहेर जाई. समुद्रकाठीही फिरत राही. मनात विचार करी. एके दिवशी तो रात्री निजला होता. परंतु केव्हा तरी उठून बाहेर निघून गेला. मधुरी जागी होऊन पाहते तो मंगा नाही. तिने उठून सर्वत्र पाहिले. मंगा कोठेही नाही. तिला वाईट वाटले. का असे मंगा करतो असे तिला वाटले. ती बाहेर झोपाळयावर बसून रडत होती. बराच वेळ झाला. पहाट होत आली. कोंबडा आरवला. दंवबिंदू टपटप पडत होते. फुलांचा मंद गंध येत होता. हळूच मंगा आला. तो मधुरीसमोर येऊन उभा होता. तो पाठीमागे झाला. त्याने तिचे डोळे धरले. ते ओले होते.’
‘मधुरी, सारखे रडायला काय झाले तुला?’
‘मंगा काय सांगू तुला?’
मंगा एकदम रागावला. त्याने मधुरीला ओढीत घरात नेले. त्याने तिचे दोन्ही हात धरुन गदगदा हलविले व म्हणाला, झाले काय तुला मुळूमुळू रडायला? सांग, कोणी मारले का आहे? कोणी छळले का आहे?’
‘मारले असतेस, छळले असतेस तरी बरे झाले असते हो मंगा. तो मारही गोड मानला असता.’
‘मग काय केले मी? का असे डोळयांत पाणी आणून मला दु:ख देतेस? मी दूर कोठे जावे असे म्हणतो, त्याचे इतके वाईट वाटून घेतेस? मी का मरायला चाललो आहे? लौकर परत येईन. काही दिवस राहून परत जाईन. तुझ्या मुलाबाळांना सुख मिळावे म्हणून मी जात आहे.’
‘माझी मुले सुखात आहेत. ती बिचारी काही मागत नाहीत.’