‘नाही, आता नेस. उठ, नेस.’
मुले आईच्या पाठीस लागली. मनीही म्हणू लागली, ‘आता नेस, आत्ताच नेस.’ शेवटी माता उठली. तिने ते नवीन लुगडे परिधान केले. मुले आईकडे पहात राहिली. मनी बाहेर गेली नाचत व फुले तोडून घेऊन आली.
‘सोन्या, आईच्या डोक्यात फुले घालू ये.’ ती म्हणाली.
तिन्ही मुलांनी आईची पूजा केली. मधुरी. सारे त्यांना करू देत होती.
दिवाळीची मंगल पहाट झाली. बुधाने तेल, उटणे आणून दिले होते. मधुरीने बाहेर दिवे जाळले. तिने मुलांना न्हाऊ-माखू घातले आणि ती स्वत: न्हायला बसली. तिचे न्हाणे झाले. ते नवीन लुगडे ती नेसली. आज मधुरी प्रसन्न दिसत होती. आणि बुधा आला.
‘बुधाकाका आले.’ मुले गर्जली.
‘तुमच्या झाल्या वाटते आंघोळी?’ बुधाने विचारले.
‘हो केव्हाच!’ आईचेसुध्दा झाले न्हाणे. रुपल्या म्हणाला.
‘तुमची आंघोळ झाली का?’ सोन्याने विचारले.
‘नाही.’ तो म्हणाला.
‘आमच्याकडेच करा.’ रुपल्या म्हणाला.
‘मी तुम्हाला आवडतो?’
‘हो, आवडता.’ चिमुरडी मनी म्हणाली.
बुधा आत आला. मुले बाहेर फटाके वाजवू लागली. चंद्रज्योती लावू लागली. मधुरी बसली होती.
‘ये बुधा.’
‘मला न्हाऊ-माखू घाल. दहा वर्षांत कोणी घातले नाही.’
‘बरे हो.’
आणि बुधाच्या अंगाला मधुरीने तेल, उटणे लावले.
‘आता तोंडाला लाव; नाही तर पुढच्या जन्मी माकड होशील हो.’
‘तुझ्याच हातांनी लाव. हाती घेतलेले काम पुरे करावे.’
‘मी नाही.’
परंतु बुधाने मधुरीचे हात धरले व ते तेलाचे, उटण्याचे हात स्वत:च्या तोंडावरून त्याने फिरविले. ते हात आपल्या तोंडावर त्याने धरून ठेवले. कढत श्वास मधुरीच्या हाताला लागत होते. ती गुंगली.