आजीबाईला किती आनंद झाला होता. जणू सर्व जन्मात असा आनंद तिला झाला नसेल, बारसे झाले, नाव ठेवले गेले, कोणते नाव! सोन्या.’
पुढे काही दिवसांनी बाळबाळंतीण घरी आली. झोपडीत एक पाळणा टांगला गेला. बाहेरच्या अंगणात मंगाने झोपाळा टांगला. सायंकाळी कामावरुन आल्यावर तो लहान बाळाला घेऊन झोपाळयावर बसे. बाळाजवळ हसे. मंगाला एकदम पोक्त झालो असे वाटू लागले. मूल होईपर्यंत अल्लडपणा असतो. मूल होताच माणसांचा अल्लडपणा जातो. जणू नवीन आईबाप आपला अल्लडपणा मुलाला देतात.
मुलाला नटवावे असे मंगाला वाटे. त्याने मुलाला बाळलेणे केले. प्रथम मधुरी बोलत नसे. परंतु एके दिवशी ती म्हणाली,
‘कर्ज काढून हे बाळलेणे केलेस. खरे का मंगा?’
‘हो.’
‘नको हो कर्ज. नकोत दागिने.’
‘दर वेळेस थोडेच कोणी करणार आहे! लहानपणी मुलाला दागिने शोभतात. या बाळाचे दागिने पुढच्या मुलांना होतील. खरे ना!’
‘किती होतील मला मुले?’
‘मला काय माहीत मधुरी? तू कंटाळलीस का?’
‘मंगा फुले फुलवायला मला का आवडत नाही? मी नाही हो कंटाळले. मुलांना खेळवून माझी मांडी दमणार नाही. तो बघ उठला राजा. आण त्याला मंगा काढून. मी येथेच बसते.’
‘बरे राणीसाहेब.’
मंगाने बाळाला आणले. मायेने मांडीवर घेतले.
‘खरेच मी राणी आहे. काय आहे मला कमी? सारे सारे आहे हो मंगा. मी राणी आहे. परंतु तू माझा राजा आहेस. खरे ना?’
‘होय, मीही राजा आहे. मधुरीचा राजा.’
मधुरी आता फारशी कामाला जात नसे. मंगा तिला म्हणे, लहान मुलाला घेऊन कामाला नको जाऊस. कधी कधी बाळाला घेऊन मधुरी म्हातारीकडे जाई. घटकाभर बसे व येई.
दिवस जात होते. सोन्याचा वाढदिवस आला. कसा करायचा वाढदिवस साजरा? मंगा विचार करीत होता. त्याने मधुरीला नवे पातळ आणले. बाळाला नवीन कापड आणले. एक पिसांची सुंदर टोपी त्याने आणली. घरात खीर करण्यात आली. वाढदिवस झाला. सोन्या भराभर वाढू लागला. चालू लागला, बोलू लागला. मंगा त्याला आई म्हणायला शिकवी. मधुरी त्याला बाबा म्हणायला शिकवी. मोठी गंमत होई. मंगा आता रात्रीही कामाला जाई. ज्या ज्या वेळेस रात्री काम असे तेव्हा तो जाई.