दुर्दैवी मंगा
पण मंगा कोठे आहे? तो खरोखरच मेला का? त्याचे गलबत बुडाले, तोही बुडाला का? मंगा बुडाला नाही, मेला नाही. मंगा वाचला. लाटांवर तो फेकला गेला. तो पटाईत पोहणारा होता. लाटांवर तो स्वार झाला. गलबत बुडाले. माल समुद्रावर पसरला. मंगाने स्वत:चे लहानसे गाठोडे पटकन पकडले. ते छातीपाशी धरून तो पोहत होता. ते त्याने कमरेला बांधले. काय होत त्या गाठोडयात? त्यात गोधडी होती. मधुरीचे हृदय होते.

पोहून पोहून मंगा दमला. तो लाटांवर जणू झोपला. जणू पाळण्यात आंदुळला जात होता. समुद्राच्या लाटांनी त्याला खेळवीत
खेळवीत एका किना-यावर नेऊन सोडले. आणि तेथे तो जागा झाला. जागा होताच कमरेभोवती पाहू लागला. ते गाठोडे होते.

किना-यावर कोणी नव्हते. कोणत्या देशाच्या किना-यावर तो येऊन पडला होता? त्याला काही कळेना. प्रवासाची ही पहिलीच त्याची पाळी. तो सभोवती पहात होता. काही चिन्ह दिसेना. जवळपास वस्ती दिसेना. त्याने नेसूचे धोतर व अंगातील कपडे वाळत टाकले. तो दिगंबर होऊन तेथे बसला होता. त्याला मोकळेपणा वाटत होता. त्याने ते गाठोडयातील कपडेही वाळत टाकले. ती गोधडी त्याने वाळत टाकली. सुंदर मधुरीच्या हातची गोधडी. त्या गोधडीनेच आपणांस वाचविले असे त्याला वाटले. त्याने ती गोधडी पुन:पुन्हा हृदयाशी धरली. ती स्वत:भोवती गुंडाळली. माझी मधुरी, माझी मधुरी असे तो म्हणे व नाचे.

कपडे वाळले. त्याने पोशाक केला आणि निघाला. कोठे जाणार? आत आत जायचे त्याने ठरविले. त्याला भूक लागली होती. त्याला तहान लागली होती. परंतु चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. एके ठिकाणी त्याला एक खळखळ वाहणारा झरा आढळला. तेथे तो पाणी प्याला. थोडी विश्रांती घेऊन तो निघाला. आता किर्र झाडी होती. रानात वानर खूप होते. ते हुपहुप करीत उडया मारीत होते. सूर्यप्रकाशाचा तेथे प्रवेश नव्हता. मंगा दमला होता तरी झपझप जात होता. रात्रीच्या आत कोठे तरी निवा-याची जागा मिळावी म्हणून तो धडधडत होता.

आता जंगल संपले. ओसाड प्रदेश दिसत होता. रस्ता कोठेच दिसेना. तो आता अगदी थकून गेला होता तरी चालतच होता. त्या ओसाड प्रदेशातून तो जात होता. आता सखल प्रदेश लागला. मंगाच्या पायांत काही नव्हते. पायाला दगड खुपत होते. चालता चालता तो एका सरोवराच्या काठी आला. मोठे रमणीय प्रसिध्द सरोवर. तेथे घाट बांधलेला होता. यावरून या बाजूला कोठे तरी वस्ती असावी असे त्याला वाटले. सरोवराच्या काठी झाडे होती. सरोवरात लाला कमळे होती. थंडगार वारा वहात होता. तो पोटभर पाणी प्याला. त्या घाटावर तो झोपला. दगडाची उशी करून मधुरीची गोधडी अंगावर घेऊन तो पडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel