‘माझ्या जीवनाचा तू राजा. माझ्या जीवनावर तुझे अक्षय्य राज्य. माझे प्रेम ही तुझी धनदौलत. तू माझा राजा. या मधुराचा गोड गोड राजा.’
‘मधुरी, खरेच मला राज्य मिळत होते.’

‘कोठचे राज्य?’
‘एका श्रीमंताची मुलगी बाबांनी माझ्यासाठी आणली होती धनदौलतीसह.’
‘मग?’
‘ती मी नाकारली.’

‘का? वेडाच आहेस तू.’ ‘मी वेडाच आहे. तू मला वेडे बनविले आहेस. वेडेपणाचे धडे किती वर्षापासून तू मला देत आहेस. मधुरी, तू दिलेले राज्य, त्यापुढे इतर सारी राज्ये तुच्छ आहेत. बाबांनी मला घरातून हाकलून दिले. मी वणवण करीत दूरदूर. भटकत होतो. आज पुन्हा या टेकडीवर आलो. पूर्वीच्या आठवणींच्या समुद्रात डुंबत होतो. त्या आठवणीत न्हाऊन-माखून मी येथे पडलो होतो व मला झोप लागली. तू केव्हा आलीस?

आले. दमलेले, भडकलेले डोके मांडीवर घ्यायला आले. मंगा, तू किती अशक्त झालास?
तुझ्या प्रेमामुळे मी जगलो. नाहीतर मेलो असतो. मधुरी, तुला कोणी आणले येथे?
‘माझ्या प्रेमाने.’

‘तू नेमकी येथेच एकदम कशी आलीस?’
‘या टेकडीवरच आपण प्रेमाचे ढीग गोळा केले. प्रेमाचे पर्वत रचिले. या टेकडीवर बसून प्रेमाचे सागर उचंबळविले. प्रेमाच्या बागा आपण फुलविल्या. टेकडी आपले मंदिर, प्रेमाचे मंदिर. मी येथे नको येऊ तर कोठे जाऊ? जेव्हा जेव्हा मी दु:खी असते तेव्हा मी येथेच येते. येथे मला मंगाचे हसणे बोलणे, खेळणे, खिदळणे सारे ऐकू येते. मंगाची मूर्ती मला दिसते.’

‘आज का तू दु:खी आहेस?’
‘या वेळेस सुखी आहे.’
‘मधुरी, असा कापरा का आवाज?’
‘प्रेमाच्या वा-याने वेल कापत आहे.’

‘मधुरी, काय झाले?’
‘गोड झाले.’
‘म्हणजे?’
‘माझ्या देवाच्या गाठीभेटीसाठी आजपासून मी मोकळी झाले.’
‘कोणी बांधिले होते?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel