‘होय जगेन.’
‘स्वत:ची काळजी करशील ना?’
‘करीन.’
‘जाते आता मी.’
मधुरी गेली. तिने मागे वळून पाहिले. पुन्हा निघाली. पुन्हा वळून तिने पाहिले. पण आता गेली. बुधा वर गेला. ती उशी त्याने हृदयाशी धरली. तिच्यावर त्याने अभिषेक केला. परंतु मनात म्हणाला, मला रडता नाही कामा. मधुरीच्या आनंदासाठी मला हसले पाहिजे. तो हसला. ते हसणे होते की रडणे!
‘इकडे टेकडीवर मंगा वाट पाहात होता. हळूच मधुरी येऊन डोळे धरील असे त्याला वाटे. जरा चाहूल लागताच मधुरी आली असे त्याला वाटै. तो वाट पाहून दमला. मधुरी येईल का? का बुधाकडेच राहील! बुधाने तिला नाही येऊ दिले तर? बुधाचे तिच्यावर प्रेम आहे. मी उल्लू आहे. मधुरीला मी आवडतो की बुधा? उल्लू मंगा काय कामाचा? बुधाजवळ मधुरी राहिली तर काय वाईट? मी असा शतदरिद्री, भिकारी. बुधाजवळ मधुरी राहील तर तिला कशाची वाण पडणार नाही. जाऊ का मी या अथांग सागरात? लहानपणापासून हा समुद्र मला हाक मारतो. जाऊ का त्याच्या घरी? करु का मंगाचा शेवट? असे विचार त्याच्या मनात उसळू लागले आणि तो खरेच उठला. टेकडीवरुन खाली उतरला. समुद्राकडे चालला. तो तेथे पाण्यात उभा होता. पुढे जाण्याचे त्याला धैर्य होईना, मधुरी आली तर? आपण न दिसलो तर तिला काय वाटेल? माझ्यासाठी तिने घरदार सोडले, आईबाप, भावंडे, सर्वांचा तिने त्याग केला. माझ्या एका खांबावर तिच्या जीवनाची सोन्याची द्वारका उभी आहे. ती काय म्हणेल मी गेला तर? तिला फसवू, रडवू? दुष्ट आहे मी. मंगा अशा प्रकारे विचारांच्या सागरात हेलावत होता. तो पुढे जाई. मागे येई. लाटा पुढे जात. मागे येत. मागे येत. त्याप्रमाणे त्याचेही चालले होते.
मधुरी टेकडीवर आली. तो तेथे मंगा नाही. तिच्या पोटात धस्स झाले. मंगाचे शब्द तिला आठवले. चल, आपण समुद्रात जाऊ. हे ते शब्द तिला आठवले. ती घाबरली. बावरली. तिने दूर पाहिले. कोणीतरी पाण्यात उभे आहे असे तिला वाटले. ती धावली. तिच्याने हाक मारवेना. ती एकदम पाण्यात शिरली. पाण्याला भिणारी मधुरी आज निर्भय झाली होती. मंगा तिकडे एकदम आणखी पुढे गेला. मधुरी पुढे चालली. एकाएकी मंगाने मागे पाहिले तो मधुरी त्याला दिसली. पाण्यात धडपडणारी मधुरी. मधुरीने शेवटी केविलवाणी हाक मारली. मंगा मागे आला. प्रेमाने त्याला मागे खेचले. तो बाहेर आला.
‘तू कशाला पाण्यात आलीस? तू भीत असस ना?’
‘तू जवळ असलास म्हणजे मला भीती वाटत नाही. मी मरणालाही तुझ्याबरोबर मिठी मारीन. मंगा, तुम्ही सारे का रे माझा छळ करता?’
‘सारे म्हणजे कोण?’
‘तू व बुधा, मधुरीला मरु दे, मरु दे.’
‘मधुरी!’