‘बाबा, उठा ना.’ रुपल्या म्हणाला.
‘तुझी आई मला म्हणते निजून रहा. तुझ्या आईचे ऐकायला हवे. खरे ना?’ मंगाने विचारले.
‘बाबा, तुम्ही आईचे नेहमी ऐकता का?’ सोन्याने विचारले.
‘बहुतेक ऐकतो.’
‘तुम्ही न ऐकलेत तर का आई मारते तुम्हांला?’
‘हो.’
‘मग तुम्ही रडता?’
‘हो.’
‘पुरे करा रे. जा बाहेर खेळायला. त्यांना निजू दे. मधुरी म्हणाली. मुले बाहेर गेली. मधुरी तेथेच उभी होती. कोणते विचार होते तिच्या मनात?’
‘उठू का मधुरी?’ मंगाने विचारले,
‘नको, आज पडून राहा. रोज उठून बंदरावर जायचे. आज झोप घे जरा. किती तरी वर्षांत इतक्या उशिरापर्यंत तू निजला नसशील.’
‘आणि तू नाही का रोज पहाटे उठत?’
‘ते काही असो. मंगा, तू खरोखरच काही दिवस तरी कामाला जाऊ नकोस. माझे ऐक. मला बरे वाटेल.’
‘बरे.’
आणि खरोखरच मंगा काही दिवस कामाला गेला नाही. मधुरी कामाला जाई. मंगा मुलांजवळ खेळे, हसे, बसे. असे दिवस चालले होते. परंतु मधुरीला अतिश्रमाने ताप आला. एके दिवशी ती कण्हत होती.
‘मधुरी, काय होते?’
‘सारे अंग दुखत आहे.’
‘जरा चेपू?’
‘नको.’
परंतु मंगा उठला. मधुरीचे अंग निखा-यासारखे होते. मंगाने अंग चेपले. त्याने तिच्या अंगावर पांघरुण घातले. मधुरी रडू लागली. का बरे रडू लागली?’