‘तुला मुलगी होणार का मुलगा?’
‘मी काय सांगू? कहीही होवो. ते मंगाला आवडेल.’
‘आणि तुला?’
‘नव-याला आवडले की बायकोला आवडतेच.’
‘खरे आहे हो मधुरी.’
‘माझे डोहाळे पुरवशील ना?’
‘काय आहे तुझी इच्छा?’
‘ओळख तूच.’
‘फुले हवी असतील?’
‘नाही.’
‘दागिना हवा?’
‘नाही.’
‘काय हवे तुला?’
‘तुझे प्रेम.’
‘ते दिलेच आहे.’
‘ते रोज दे. मला कधीही सोडून जाऊ नकोस. मला कंटाळू नकोस.’
‘असे का म्हणतेस?’
‘मंगा, मुले-बाळे होऊ लागली की आम्ही बायका पूर्वीप्रमाणे थोडयाच दिसू? आम्ही आमचे लावण्य, आम्ही आमचे सौंदर्य, मुलांना देतो. आम्ही दरिद्री होतो. तुम्ही पुरुष मग कंटाळता. खरे ना?’
‘मला काय माहीत? आपणाला अनुभव काय येतील ते पाहू. तुला वाटते का की, मी तुला सोडून जाईन?’
‘एखादे वेळेस मनात येते. तुझे ते निराशेचे वचन आठवते. चल जाऊ समुद्रात. हे तुझे म्हणणे आठवते.’
‘वेडी आहेस तू मधुरी. निराशा टिकत नसते. मी ते शब्द कधीच विसरुन गेलो.’
‘बायका नाही विसरत.’
‘चल, आपण भाकर खाऊ व फिरायला जाऊ.’
दोघांनी भाकर खाल्ली. जेवताना मधून मधून मंगा मधुरीच्या तोंडात तुकडा देई. मधुरी त्याच्या तोंडात देई. दोघे हसत.