‘तिच्याजवळ मी नाही तुला लग्न करु देणार. मला मारणा-याच्या मुलीजवळ लग्न? छट्, अशक्य. पित्याचा अपमान करणा-याच्या मुलीजवळ लग्न? बोलू नकोस. तुला काही स्वाभिमान आहे की नाही? चीड आहे की नाही? मंगा, हे भरलेले ताट देवाने आणले आहे; ते लाथाडू नकोस. त्या मधुरीचा नाद सोड. माझे ऐक. पित्याचे ऐकावे.’
‘इतर सारे ऐकेन. या बाबतीत नाही ऐकणार. माझ्या मनातून मधुरीला मी आता उपटू शकणार नाही. माझ्या जीवनात तिचे झाड वाढले आहे. मधुरी माझी आशा, मधुरी सारे काही. बाबा, या मंगावर रागावू नका. मला इतर काहीही सांगा. परंतु या बाबतीत नका धरु हेका.’
‘आणि मधुरीच्या बापाने ती तुला न देण्याचे ठरविले तर?’
‘तुम्ही मुद्दाम मोडता घालू नका.’
‘मी नाही घालणार. परंतु तो मुलगी देणार नसेल तर?’
‘तर मंगा वेडा होईल. वा-यावर फिरेल, समुद्रावर फिरेल.’
‘काही तरी बोलतोस. मंगा, तू मधुरीचे वेड मनातून काढून टाक. या श्रीमंत व्यापा-याचा जावई हो. आमचीही ददात मिटेल. आमचेही भाग्य फुलेल. श्रम करुन मी कंटाळलो. चार दिवस तरी सुखाचा घास खाईन.’
‘बाबा, तुम्ही कामाला नका जाऊ. मी दुप्पट काम करीन. मधुरी काम करील. आम्ही तुम्हाला सुखाचा घास देऊ.’
‘गरिबाच्या घरात सारे श्रमतील तेव्हाच घर चालते. तुम्ही श्रमून आम्हांला सुखाचा घास द्याल; परंतु तुम्हाला उपाशी राहावे लागेल. तुमच्या मुलाबाळांना उपाशी रहावे लागेल. गरिबाला मेल्यावरच विश्रांती. काम करता करताच तो मरायचा.’
‘मला श्रम आवडतात.’
‘आज आवडतात, उद्या कंटाळशील.’
‘काही असो. मधुरीशिवाय मी नाही जगू शकणार. मी माझी हवा, मो माझा दिवा. तिच्याजवळ जीवनात आशा व प्रकाश. मी कधी दु:खी कष्टी असलो तर हळूच कोठे तरी जाऊन चोरुन मधुरीला मी पुन्हा पाहून येतो. मग मी पुन्हा हसतो, आनंदतो. मधुरी माझ्या सर्व संखाचा ठेवा. ती तुमच्या मंगाचे अमृत, ती या मंगाची संपत्ती. बाबा, मधुरीशिवाय जगातील सारी संपत्ती मिळाली तरी मी भिकारी असेन आणि एक केवळ मधुरी मिळाली तर मी स्वत:ला जगातील सर्वांपेक्षा अधिक श्रीमंत मानीन.’
‘पण शब्दांनी पोटं भरत नसतात.’
‘हृदये भरतात ना पण?’