‘मधुरी राग नको मानू. मी का वेडेवाकडे बोललो? काय बोललो ते देवाला माहीत, तुला माहीत.’
‘बुधा रागावू कशाला! तूही माझा आहेस. मानातले बोललास, ठीक झाले. खळखळ ओतलीस, बरे झाले.’ ती म्हणाली.
‘परंतु तुझे काय? तू होणार का माझी? येणार का माझ्या घरात? माझे घर, माझी संपत्ती, माझे जीवन, माझे सारे सारे-त्याला कृतार्थ कर. सांग, काय करणार सांग.’ तो तिचे हात धरून म्हणाला.
‘बुधा, आणि मंगा आला तर?’
‘मंगा असता तर एव्हाना येता. बोटभर चिठी तरी येती. तो अशा रीतीने तुम्हांला दु:खात ठेवता ना. चिंतेत ठेवता ना. देहरूपाने मंगा आता नाही. थोडी तरी त्याच्या जिवंतपणाची आशा असती तर मी असे बोललो नसतो. मधुरी, दहा वर्षे मी नाही का एकटाच बसलो? तसा मरेपर्यंत बसलो असतो. एक दिवस तू माझीही होशील या आशेने जन्मजन्म शांतपणे बसलो असतो. मंगा नाही म्हणून तर मी बोलतो आहे. आणि आता मंगाची बातमी ऐकूनही बरेच दिवस झाले. आता आपण काही केले तर त्यात उल्लूपणा दिसणार नाही. तुझे-माझेही लहानपणी प्रेम होते हे सर्वांस माहीत आहे. मी तुझ्या प्रेमास्तव आजपर्यंत असा फकिरासारखा राहिलो ही गोष्ट लोक जाणतात. त्यांन बरे वाटेल. लोक आशीर्वादच देतील. बरे झाले म्हणतील. मधुरीला आधार झाला. बुधाला जीवन मिळाले असे म्हणतील. बोल, मधुरी, बोल.’
‘बुधा, मी एकदम काय सांगू? विचार करीन. आणि मंगा देवाघरी काय म्हणेल? त्याचा आत्मा माझ्याभोवती घुटमळत असेल. आमच्या झोपडीभोवती त्याचा आत्मा प्रदक्षिणा घालीत असेल. तो काय म्हणेल?’
‘तोही आशीर्वाद देईल. म्हणेल, लहानपणचे शब्द खरे झाले. आपल्या मित्राच्याही जीवनात आनंद फुललेला पाहून, वसंत आलेला पाहून, प्रेम दरवळलेले पाहून तो नाचेल. मधुरी, आपण का फसवीत आहोत?'
‘परंतु विचार करीन. मागून पश्चाताप नको व्हायला. खरे ना बुधा?’
‘हो! दहादा विचार करावा व मग पाऊल टाकावे; परंतु मधुरी, यात विचार करण्यासारखे काय आहे? हृदयाचा कल बघ. हृदयाची हाक ऐक. हृदयाचा सूर ऐक. तो फसविणार नाही.’
‘बुधा, मी ते सारे पाहील. मी एकटी रात्री बसेन त्या वेळेस हृदयातील खरा सूर नीट ऐकू येईल. खरे ना? चल आता जाऊ. मुलांकडे जाऊ. त्यांच्या खेळात जरा मिसळू, आपण लहान होऊ. चल, लहानपणाची होऊ. चल.’