समुद्राची हाक
समुद्र म्हणजे एक महान् काव्य आहे. समुद्र म्हणजे महान् संगीत. समुद्र म्हणजे सृष्टीचे रामायण, महाभारत. अनंत कालापासून हा गर्जना करतो आहे. समुद्र कधी मुका होता? असेल का असा कधी की ज्या वेळेस तो केवळ नि:स्तब्ध होता? असेल का असा काळ की ज्यावेळेस त्याच्यावर तरंग उठत नसतील, त्याच्यात हालचाल नसेल? केव्हापासून हा गर्जू लागला? नाचू लागला? हा सागर का गर्जत आहे? का नाचत आहे? कोणासाठी हा नाच? कशासाठी ही गर्जना? कोणाची त्याला आठवण येत आहे? कोणासाठी हा आक्रोश? समजायला मार्ग नाही. कोणाला रहस्य कळणार? कोणाला याचे गूढ कळणार?’

समुद्र म्हणजे मानवी मनाचे प्रतीक तर नाही? मनुष्याच्या मनाचा अंत पार लागत नाही. मनुष्याचे मन वरवर उथळ वाटते. ते हसते, खेळते, परंतु आत प्रचंड लाटा उसळत असतात. मन कधी शांत, स्थिर वाटते, तर कधी वासनाविकारांचा झंझावात उठून ते प्रक्षुब्ध होते, या मनात काय काय भरले आहे कोणास ठाऊक? मनात रत्ने आहेत, मोती आहेत. शिंपा आहेत. कवडया आहेत. मनाला क्षणाची उसंत नाही. विश्रांती नाही. समुद्राला भरती असो, ओहोटी असो, खळखळ तेथे अखंड सुरूच आहे. कोठे आहे त्याचा विसावा? तसेच मनाने आपण निजलो तरी आपले अनंत असे ते मन विचारावर चालत असते. तसे झोपेतही विचाराला, मनाला कोठे आहे विश्रांती? समुद्र ओरडतो आहे. मनही सारखे ओरडत असते. या मनाला कशाने समाधान नाही. ते सारखे सुखासाठी अट्टाहास करीत असते. कोणाला तरी सारखे हाक मारीत असते. कोण भेटले म्हणजे त्याला कायमचे समाधान होईल?

समुद्रा, कोणाला रे हाक मारीत आहेस? जगातील सा-या नद्या तुझ्याकडे धावत येतात. लहान नद्या मोठया नद्यांना मिळून त्यांच्या संगतीत तुला भेटायला येतात; सारे पाणी शेवटी तुला येऊन मिळते. कोणती नदी अद्याप तुला भेटायची राहिली? गंगा, सिंधू, बंह्मपुत्रा सा-या नद्या तुला भेटल्या. सा-यांनी तुला माळा घातल्या. सा-यांना तू हृदयाशी धरलेस. तरी तुला समाधान नाही? का रे असे? एखादा वैभवशाली राजा अनेक राण्या असूनही पन: अशान्त राहतो. तसेच तुझे आहे. कोणती गंगा तुला अजून हवी आहे? सांग, का ही अशांती? समुद्रा, तुला कशाची भूक लागली आहे? कशाने तुझी भूक शांत होईल! तुझ्या पोटात म्हणे वडवानळ पेटत असतो. तुझ्या पोटात सारखीच आग भडकलेली आहे. कोणता घास मिळाला म्हणजे तुझी अग्नी शांत होईल? आजपर्यंत लाखो गलबते तू भक्षिली असशील. लाखो प्राणी तू भक्षिले असशील. तरी तुझे समाधान कसे कसे होत नाही? तुझी अनंत भूक शांत व्हायला सा-या जगाचा का घास तुला हवा आहे? तुझ्या मनात हाच झगडा चालला आहे? का करू का हे जगत्, खतम्, टाकू का गिळून, असे तर नाही ना तुझ्या मनात येत? तुझ्या सहस्त्र लाटा जगाला ओढण्यासाठी खवळून खवळून येतात. परंतु पुन: तू त्यांना आवरतोस. समुद्रा, किती तुझा हा संयम! का ही तुझी धडपड?

तू या मानवजातीसाठी का आक्रोश कारीत आहेस? (तू का ऐक्योनिषद्र शिकवीत आहेस? ) येणारे सारे प्रवाह मी जवळ घेतो, सम भावाने त्यांना वागवतो; त्याप्रमाणे मानवांनी वागावे असे तर तू नाही ना सुचवीत? तू सारे पाणी जवळ घेतोस म्हणून तू आटत नाहीस, म्हणूल तुला मरण नाही. त्याप्रमाणे मानव जर परस्परांस प्रेमाने जवळ घेतील तर मानव जात टिकेल. नाहीतर मानवप्राणी जगातून नष्ट होईल असे तर नाही ना तुला सांगावयाचे? अनंत काळापासून तू ही गर्जना करतो आहेस. परंतु मनुष्याने ती अद्याप ऐकिली नाही. अजूनही मनुष्य मनुष्याला खात आहे. माणूस माणसाला मारीत आहे. लुटीत आहे, छळीत आहे. माणूस माणसाला गुलाम करीत आहे, पायाखाली तुडवीत आहे. मनुष्यप्राणी जन्माला येऊन हजारो वर्षे झाली तरी तुझा संदेश त्याला अद्याप कळला नाही. माझी जात श्रेष्ठ, माझा देश श्रेष्ठ, मी श्रेष्ठ यापलीकडे या मानवप्राण्याची अद्याप दृष्टी जात नाही. समुद्रा, म्हणून का तुझा तडफडाट?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel