‘सोन्या, आईला आणतोस का बोलावून?’

‘हो.’
असे म्हणून सोन्या गेला. तो पळतच गेला. तो कावराबावरा झाला होता.

‘म्हातारबाई, ते गलबत बुडाले. या मुलाचा बापही बुडून मेला. त्या गलबतावरचे कोणी वाचले नाही.’
‘काय सांगता?’

‘खरी गोष्ट. गावात सर्वत्र ही बातमी गेली. तुमच्या गावावर मोठीच आपत्ती. तुमच्या गावातील बरेच लोक त्या गलबतावर होते. त्या मुलाच्या आईची समजूत तुम्हीच घालू शकाल. गरीब बिचारी.’

आणि सोन्याची आई आली. धावत आली. गावात गेलेली वार्ता तिच्याही कानांवर आली. ती रडत होती.
‘आजी, आजी, काय झाले?’

‘मधुरी, उगी, रडू नको.’
‘आजी. खरेच का गलबत बुडाले?’
‘हो. सारे सांगतात.’

‘अरेरें! मंगा, कोठे आहेस मंगा? आजी, मलाही समुद्रात जाऊ दे. मंगाला जाऊन भेटू दे. त्याच्याशिवाय कशी राहू? माझी आठवण करीत बुडाला असेल. मधुरी म्हणून त्याने हाक मारली असेल. आजी इतके दिवस धीर धरला. येईल येईल आशा होती. अरेरे, असे कसे झाले? तुझा आशीर्वाद खोटा कसा झाला? ही माझी मुले. कोण त्राता त्यांना? आम्हाला सुखात ठेवता यावे म्हणून मंगा गेला. मी काम करते, ते त्याला पाहवेना. मुलांच्या अंगावर नीट कपडे नाहीत म्हणून माझा मंगा रडे. मुलांना दागिने नाहीत म्हणून रडे. मला नेसायला उंची लुगडे नाही, म्हणून त्याला वाईट वाटे. आमच्यासाठी मृत्यूच्या जबडयात गेला. लहानपणापासून त्याला समुद्र हाक मारी. पुन्हा पुन्हा समुद्रात जाण्याचे बोले. आजी, ज्या दिवशी आमचा नवीन संसार सुरू झाला त्याच दिवशी रात्री फिरताना मंगा म्हणाला, मधुरी, चल समुद्रात जाऊ. परंतु एकटा गेला. घात झाला आजी, घात. कोणाजवळ आता बोलू? कोणाजवळ हसू? कोण पुशील माझे डोळे? कोण बोलेल गोड गोष्टी? मंगा, कशाला रे गेलास? मी सारखे सांगत होते नको जाऊस म्हणून. परंतु माझ्यावर रागावे. मी शेवटपर्यंत हट्ट धरला असता तर गेला नसता. माझेच चुकले. माझ्या प्रेमाने मी त्याला बांधून ठेवले पाहिजे होते. काय करू आता? आभाळ फाटले, कु-हाड कोसळली. आजी, जाऊ दे मला समुद्रात. घेऊ दे बुडी. नको जगणे. आता मरणे बरे. सोड आजी, सोड.’

‘मधुरी, हे काय? या मुलांना कोण? ही मुले म्हणजे मंगाची ठेव. मंगाची आठवण. यांच्याकडे बघ. रडू नकोस. काय करणार आपण? हा बघ सोन्या रडतो आहे त्याला जवळ घे.’ म्हातारी समजावीत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to तीन मुले


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
खुनाची वेळ
गावांतल्या गजाली
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
रत्नमहाल